Join us

ऐतिहासिक सीएसटीचे सुशोभीकरण, मध्य रेल्वेचा खासगी संस्थेशी करार

By admin | Published: March 15, 2017 4:16 AM

देशभरातील ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. त्यात मध्य रेल्वेच्या ऐतिहासिक सीएसटीचाही सहभाग असून

मुंबई : देशभरातील ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. त्यात मध्य रेल्वेच्या ऐतिहासिक सीएसटीचाही सहभाग असून, त्यासाठी मंगळवारी एका खासगी संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनसने युनेस्कोच्या हेरिटेज वास्तूंमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेल्या हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर १८८७मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधले होते. असे हे स्थानक पाहण्यास जगभरातूनही पर्यटक येतात. सीएसटीचे पर्यटकांच्या दृष्टीने असणारे स्थान पाहता त्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएसटीचे सुशोभीकरण करताना बेस्टच्या डेपोकडील भाग आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ७च्या समोरून बाहेर पडल्यानंतर दिसणाऱ्या सीएसटीच्या भागाचे सुशोभीकरण केले जाईल. त्यासाठी स्थापत्य विशारद यांचीही मदत घेतली जाणार असून, या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. इमारतीत असणाऱ्या काही मूर्ती, सांकेतिक भाषा व संदेश यांनाही प्रकाशझोतात आणले जाईल आणि त्यांचेही सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. याचा अहवाल येत्या काही महिन्यांत मध्य रेल्वेकडे सादर केला जाणार आहे. या सुशोभीकरणाला स्टेट बँक आॅफ इंडियाचेही सहकार्य लाभणार आहे.