माहीम चौपाटी परिसराचे होणार सुशोभीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:56 AM2019-01-16T01:56:34+5:302019-01-16T01:56:52+5:30
प्रस्ताव समितीकडे : रोषणाई व बच्चे कंपनीसाठी खेळण्यांची व्यवस्था
मुंबई : पर्यटकांच्या गर्दीमुळे अनेक वेळा चौपाट्यांवर अस्वच्छता निर्माण होते. हा अस्वच्छतेचा मुद्दा गेल्या वर्षी प्रचंड गाजला होता. त्यामुळे चौपाट्यांना स्वच्छ ठेवण्याबरोबर विद्युत रोषणाई व खेळण्यांची व्यवस्था करून बच्चेकंपनीसाठी चौपाटी आकर्षक केली जाणार आहे. त्यानुसार माहीम चौपाटीच्या अडीच कि.मी. परिसराचे लवकरच सुशोभीकरण केले जाणार आहे. यामध्ये कोळी सांस्कृतिक मंच, व्यायामशाळा, वाहनतळाचाही समावेश असणार आहे.
गिरगाव, दादर, वर्साेवा, जुहू, आक्सा, मनोरी अशा काही मुंबईतील प्रसिद्ध चौपाट्या आहेत. मात्र या चौपाट्यांमध्ये माहीमची चौपाटी दुर्लक्षित राहिली असल्याने तिला नवीन लूक देऊन पर्यटकांना आकर्षित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण किनारा स्वच्छ करून आकर्षक करण्यात येणार आहे. किनाऱ्याजवळील पायवाटेची पुनर्बांधणी आणि आवश्यकतेनुसार पक्की पायवाट बांधण्यात येणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिताच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. या सौंदर्यीकरणात जुन्या बोटी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच बोटी आणि जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी शेड उभारण्यात येणार आहे. यामुळे चौपाटीवर येणाºया देशी-विदेशी पर्यटकांना समुद्रकिनाºयावर कोळी संस्कृतीचे दर्शन होणार आहे. तसेच किल्ल्याची ऐतिहासिक प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे.
असे होणार सौंदर्यीकरण
किनाºयावर विविध प्रकारची शोभेची झाडे, फुलझाडे लावणार, पर्यटकांना बसण्यासाठी आरामदायी आसने
पे-अॅण्ड पार्कच्या व्यवस्थेमुळे पालिकेला उत्पन्न
उंचावरून मुंबईचा नजारा पाहण्यासाठी टॉवर
२.५ कि.मी. चौपाटीच्या सौंदर्यीकरणास पालिका एक कोटी २६ लाख ८३ हजार रुपये खर्च करणार आहे.