मुंबईचे सौंदर्यीकरण; खर्चाचे ओझे ७५० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:53 AM2024-01-04T09:53:59+5:302024-01-04T09:55:46+5:30

मार्च २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचा दावा.

Beautification of mumbai 750 crores of cost burden to bmc | मुंबईचे सौंदर्यीकरण; खर्चाचे ओझे ७५० कोटी

मुंबईचे सौंदर्यीकरण; खर्चाचे ओझे ७५० कोटी

मुंबई : पालिकेकडून वाजतगाजत सुरू करण्यात आलेल्या मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा आता बोजवारा उडाला आहे. २०२२ साली सुरू करण्यात आलेले सौंदर्यीकरण मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना आत्तापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या दरम्यान या कामांवर केलेल्या ७५० कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. 

मुंबईभरातील लाईटचे खांब आणि झाडांवर केलेले लाइटिंग अनेक ठिकाणी बंद असून रंगवलेल्या भिंतींचे रंग ही उडाले आहेत. यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती मिळत असून अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी अधिकारी, अभियंत्यांची तातडीची बैठक घेतली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा कायापालट करण्यासाठी सौंदर्यीकरण करा, असे आदेश दिल्यानंतर पालिकाने सौदर्यीकरणाचे काम हाती घेत सौंदर्यीकरणासाठी १७०० कोटींची तरतूदही केली. मुंबईचे सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोकळ्या जागांची निर्मिती, वाहतूक बेटे, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, सार्वजनिक भिंती रंगीबेरंगी करणे इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करून त्यांची सुधारणा, सुशोभीकरण यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. मात्र आता या सौंदर्यकरणाचा रंग उडाला असून अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून कंत्राटदारांवर  कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

असा झाला खर्च:

सुशोभीकरणात पालिकेच्या वॉर्ड स्तरावर      ५०० कोटी
रस्ते विभागामार्फत                                         १५० कोटी
अभियांत्रिकी कामांत                                       ६५ कोटी

सौंदर्यीकरणाच्या कामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रंगरंगोटी आणि प्रक्ष व्यवस्था पुन्हा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही याबाबत कडक कारवाई आणि योग्य अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.- डॉ अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका

मुंबईच्या सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत आजवर एकूण १,२८५ कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. पैकी ९९४ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये शहर विभागातील ३१९, तर उपनगरांमधील ६८५ कामांचा समावेश आहे. 

Web Title: Beautification of mumbai 750 crores of cost burden to bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.