सुंदर, स्वच्छ वसुंधरा फारच कमी राहिली आहे - डी. स्टॅलिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:50 AM2019-04-21T01:50:02+5:302019-04-21T01:50:12+5:30
पर्यावरण हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत
- सागर नेवरेकर
जागतिक वसुंधरा दिन हा २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण व वन्यजीवांचा ºहास या मुद्द्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तिथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला. अशा प्रकारे १९७० सालापासून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जात आहे. परंतु मुंबई शहरातील वने विकासाच्या नावाखाली नष्ट होत आहेत. आरे कॉलनीच्या जंगलावर गेल्या काही वर्षांपासून वनशक्ती प्रकल्पाचे संचालक डी. स्टॅलिन काम करीत आहेत. ‘अर्थ डे’च्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत.
सुंदर वसुंधरा विनाशाच्या वाटेवर आहे का?
सुंदर वसुंधरा निश्चितच फार कमी राहिलेली आहे. तसेच स्वच्छ वसुंधरासुद्धा राहिलेली नाही. त्यामुळे विनाशाच्या दिशेने प्रत्येक दिवस आपण पुढे-पुढे चालत जातोय. विकासाच्या नावाखाली आणि स्वत:च्या स्वार्थासाठी वसुंधरेचा नाश करीत आहोत. त्यामुळे भविष्यात होणारी मोठी हानी मानवाला सहन करावी लागेल.
आज मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, जंगलतोड केली जात असल्याने पर्यावरणाचा ºहास होताय. हे थांबविण्यासाठी काय केले पाहिजे?
पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी जी झाडे शिल्लक आहेत त्यांची जोपासना केली पाहिजे. ती संरक्षित ठेवली पाहिजेत. ज्याप्रमाणे वृक्ष नष्ट होत आहेत त्याचा परिणाम तापमान वाढीवर होतोय. तापमान वाढल्याने संपूर्ण वातावरणात बदल होत आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. येणाºया काळामध्ये अन्न मिळणे आणि शेती करणे कठीण होऊन जाईल. दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत जाईल. या गोष्टींकडे लक्ष न देता, तुम्ही रोपे लावली असे सांगत आहात. ही सर्व लोकांच्या डोळ्यांत धूळफेक आहे. ३३ कोटी वृक्ष लावले, तर या रोपांना दरदिवशी ३३ कोटी लीटर पाणी लागेल, ते कुठून आणणार आहात? आकड्यांचा खेळ आणि कागद रंगविणे, सरकारने बंद केले पाहिजे.
लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात एकाही राजकीय पक्षाने पर्यावरणाला पाहिजे तसे स्थान दिले नाही यावर काय म्हणाल?
खरं आहे, या निवडणुकीमध्ये पर्यावरणाबाबत कोणताही पक्ष अवाक्षर काढत नाहीये. भाजपच्या घोषणापत्रामध्ये वन्यजीव हा शब्द नाहीच. काँगे्रसच्या घोषणापत्रामध्ये पर्यावरणाचा उल्लेख आहे. मात्र, विस्तृत असा उल्लेख केलेला नाही. भाजप नुसते विकास एके विकासच म्हणत आहे.
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली याचा परिणाम पृथ्वीवर होतोय का?
आपल्या जीवनशैलीमध्ये ज्या वस्तूंची गरज नाही, त्या वस्तूदेखील खरेदी केल्या जातात. त्यातून आपण जास्त कचरा निर्माण करतो. कचरा म्हणजे प्लॅस्टिक पिशव्या नव्हे, त्यात इतरही कचरा येतो. इतरांना दाखविण्यासाठी ज्या वस्तूंची गरज नाही, त्या आपण घेत असतो. त्यामुळे कर्करोग, मधुमेह यांसारख्या रोगांचे प्रमाण वाढत आहे.