बुधादित्यांचे सुंदर वादन
By admin | Published: November 14, 2016 04:26 AM2016-11-14T04:26:41+5:302016-11-14T04:26:41+5:30
रागदारी संगीताकडे ‘मनोरंजन’ म्हणून पाहण्याची एक प्रवृत्ती आहे. पूर्वीच्या काळी हे संगीत म्हणजे राजे-महाराजांची एक प्रकारची मक्तेदारी असे.
रागदारी संगीताकडे ‘मनोरंजन’ म्हणून पाहण्याची एक प्रवृत्ती आहे. पूर्वीच्या काळी हे संगीत म्हणजे राजे-महाराजांची एक प्रकारची मक्तेदारी असे. त्यांच्याच आश्रयाने ही कला वाढत आणि बहरत असे. त्यामुळे तिला मनोरंजनाचे स्वरूप प्राप्त होत असे. आजही श्रीमंत आणि धनिकवर्गाच्या मनोरंजनाचे साधन म्हणून संगीताकडे पाहिले जाते. विशेषत: ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’ कंपन्या या दृष्टिकोनातून संगीताकडे पाहतात.
अशा वेळी जरा अधिक गांभीर्याने संगीताकडे पाहणाऱ्या संस्था पुढे आल्या तर ती निश्चितच समाधानाची बाब आहे. ‘फर्स्ट एडिशन आर्ट’ ही अशी संस्था आहे. केवळ बाजारातल्या चालत्या नाण्याचा उपयोग करून कार्यक्रम करणे, प्रायोजक मिळविणे आणि गल्ला भरणे असा त्यांचा कार्यक्रम नाही. त्याऐवजी ज्यांनी साधना केली आहे किंवा जे अजून साधनारत आहेत आणि ज्यांच्यापाशी काही कस आहे किंवा अस्सलपणा आहे अशा कलाकारांना श्रोत्यांच्या सन्मुख आणण्याचा ते सतत प्रयत्न करीत असतात. महालक्ष्मी (प.) परिसरातील जी ५ एस या स्टुडिओच्या सहकार्याने त्यांनी दुपारच्या रागांचा एक कार्यक्रम ‘ब्लॉक बॉक्स’मध्ये घडवून आणला. त्यात जगप्रसिद्ध सतारिये बुधादित्य मुखर्जी यांचे वादन ऐकायला मिळाले. बुधादित्य हे इटावा घराण्याची शान म्हणून ओळखले जातात. तुफानी तयारी, रागांवरची आणि माध्यमावरची पकड याबाबत त्यांचा हात धरू शकणारा सतारिया विरळा. त्यांनी ख्याल अंगाने ‘शुद्धसारंग’ वाजवला. म्हणजे विस्तृत आलाप/जोड न वाजवता विलंबित ख्यालाच्या धर्तीवरच ही अंगे समाविष्ट केली. रागाचे झगमगते रूप त्यातून उभे राहिले.
‘भीमपलासी’ हा राग त्यांनी नंतर ऐकविला. तो पूर्णत: तंतकारीच्या अंगाने. आलाप, जोड, गत, झाला या क्रमाने असा विस्तार केला की काहीच बाकी राहिले नाही. अत्यंत संयत पण संपूर्ण समाधान देणारे वादन त्यांनी ऐकविले. सौमेन मित्र यांनी त्यांना उत्तम तबलासाथ केली.