‘हिलस्टेशन्सचे सौंदर्य नष्ट होतेय’
By admin | Published: January 6, 2017 03:10 AM2017-01-06T03:10:35+5:302017-01-06T03:10:35+5:30
हिल्सस्टेशन्सवर लोक शांतता व निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी जातात, परंतु अलीकडे त्या ठिकाणीही गोंगाट, गर्दी आणि प्रदूषण होत आहे.
मुंबई : हिल्सस्टेशन्सवर लोक शांतता व निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी जातात, परंतु अलीकडे त्या ठिकाणीही गोंगाट, गर्दी आणि प्रदूषण होत आहे. हिलस्टेशन्सचे सौंदर्य हळूहळू लुप्त होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने, महाबळेश्वर-पाचगणी येथील स्थानिकांनी केंद्र सरकारची ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजना राज्य सरकारने बंद केल्याने, त्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणीत नोंदवले.
हिलस्टेशनच्या ठिकाणीही पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. जावे, तिथे गर्दी, प्रदूषण आहेच, असे मत न्या. नरेश पाटील व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.
महाबळेश्वर-पाचगणी येथे १९९८ पासून सुरू असलेली केंद्र सरकारची ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजना, राज्य सरकारने आॅगस्ट २०१५ मध्ये बंद केली व मनोरंजन पार्क बनविण्यासही बंदी घातली. तशी अधिसूचनाच काढली. या अधिसूचनेला येथील १९७ स्थानिक व व्यावसायिकांनी न्यायालयात आव्हान दिले. वन व पर्यावरण मंत्रालयाने मंजूर केल्याप्रमाणे राज्य सरकारने नवा आराखडा बनवला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अधिसूचनेनुसार, महाबळेश्वर-पाचगणीतील हरित क्षेत्रात नवे बांधकाम करण्याची परवानगी नाही व मनोरंजन पार्कही उभारता येणार नाही. ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजना केंद्राच्या परवानगीशिवाय बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बेकायदा व मनमानी आहे, असे याचिकेत म्हटले आहे. ही अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी केली असून, त्यावर राज्य सरकारतर्फे अॅड. मौलीना ठाकूर यांनी एमओईएफने दिलेल्या निर्देशांनुसारच, राज्य सरकारने प्रादेशिक आराखडा बनवल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)