मुंबई : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय रणकंदनाला सुरुवात झाली आहे़ विकासकामांचा पहिला नारळ फोडून श्रेय लाटण्यासाठी राजकीय रस्सीखेच सुरू आहे़ माटुंगा येथील नानालाल डी़ मेहता उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणाचे उद्घाटन चक्क दोन वेळा झाले़ रविवारी काँग्रेसने उद्घाटन केल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने आज पुन्हा हा सोहळा उरकला़माटुंगा येथील फाइव्ह गार्डनच्या उद्घाटनावरून असाच कलगीतुरा रंगला होता़ सत्ताधाऱ्यांनी उद्यानाचे द्वार खुले केल्यानंतर स्थानिक नगरसेविका काँग्रेसच्या नयना शेठ यांनी उद्घाटन केले होते़ स्थानिक नगरसेवक हा उद्घाटन सोहळ्याचा अध्यक्ष असतो़ मात्र निवडणुकीच्या काळात श्रेय लाटण्यासाठी शिवसेना नेते स्वत:च उद्घाटन सोहळे उरकू लागले आहेत़काँग्रसेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी रविवारी माटुंगा येथील सुशोभीकरणाचे उद्घाटन उरकले़, तर महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज पुन्हा या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले़ नर्मदा नदी मार्गक्रमण संकल्पना साकारून या उड्डाणपुलाखालील भागाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे़ हे काम स्थानिक नगरसेवक व आमदाराच्या पुढाकाराने साकार झाले असल्याचा दावा करीत काँग्रेसने अधिकृत कार्यक्रमाआधीच उद्घाटन सोहळा उरकला़ (प्रतिनिधी)
माटुंगा येथे सुशोभीकरणाचे दोनदा उद्घाटन
By admin | Published: June 14, 2016 1:45 AM