महिलेकडून रोख रकमेसह डॉलर जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्चभ्रू वर्गीयांकडे जाऊन मला लहान मूल आहे, गरीब विधवा असून कामाची गरज आहे, अशी आर्जव करीत मोलकरीण म्हणून काम मिळवायचे, थोड्या दिवसांत त्यांचा विश्वास संपादन करून घरातील किमती वस्तू, रोकड घेऊन पळ काढायचा, असा फंडा वापरणाऱ्या एका सराईत चोरट्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली. दीपिका आशिषकुमार गांगुली (४०) असे तिचे नाव असून मुंबई शहर व उपनगरात तिने ५० हून अधिक जणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. तिच्याकडून १० हजारांच्या रोकडीसह अडीच हजार अमेरिकन डॉलर जप्त केले.
गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाने तिला शुक्रवारी अटक केली असून मुंबईसह शेजारच्या राज्यातही तिने अनेक ठिकाणी चोरी केल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. २६ मे रोजी तिने जुहू येथील एका व्यावसायिकाकडे काम करताना अमेरिकेन डॉलर घेऊन पळ काढला. त्याबाबत तपास सुरू केला असता तिच्याबद्दल कोणाकडे माहिती मिळाली नाही. ती कधी सुनीता, वनिता, तर आशा, उषा, नीशा अशी वेगवेगळी नावे सांगत असे, तिच्याबद्दल काहीच माहिती नसल्याने घर मालक पोलिसांकडे तक्रार देण्याच्या फंदात पडत नसत. मात्र परकीय चलन चोरून नेल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नसल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून मिळालेल्या माहितीनुसार पाेलिसांनी तिची ओळख पटविली. शशिकांत पवार प्रभारी पोलीस निरीक्षक मालमत्ता कक्षाचे प्रभारी अधिकारी व पथकाने पाळत ठेवून तिला अटक केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी ती वारंवार घर बदलत असे. चाैकशीत २००३ पासून ५० ठिकाणी तिने अशा प्रकारे चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
......................................