सफाई कामगार बनला पालिकेचा मुकादम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:08+5:302021-07-16T04:06:08+5:30
एमएमआरडीएमध्ये घर देण्याच्या नावाखाली पोलिसासह अनेकांना गंडा शिवडी पोलिसांकडून तपास सुरू मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत ...
एमएमआरडीएमध्ये घर देण्याच्या नावाखाली पोलिसासह अनेकांना गंडा
शिवडी पोलिसांकडून तपास सुरू
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत हक्काचे घर असावे म्हणून अनेकांची धडपड सुरू असते. अशाच घराच्या शोधात असलेल्या नागरिकांना एमएमआरडीएमध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगाला शिवडी पोलिसांंनी बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. विजय मारुती कांबळे (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, सर्वसामान्यांसह पोलिसालाही त्याने पावणेअठरा लाखांना गंडविले आहे.
शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक अभिजित जाधव हे घराच्या शोधात असताना मित्राकडून त्यांना कांबळेबाबत माहिती मिळाली. कांबळे हा मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाचा नातेवाईक असून महानगरपालिकेत मुकादम म्हणून काम करतो. त्याचसोबत तो एमएमआरडीएच्या गृहप्रकल्पाचेदेखील काम करीत असून, कमी किमतीत घर मिळवून देत असल्याचे मित्राने सांगितले. त्याने संबंधित पोलीस नातेवाइकाकडे चौकशी करताच त्यानेही कांंबळे काम करून देणार असल्याचे सांगितल्याने विश्वास बसला.
कांबळेचे उच्च राहणीमान आणि त्याच्या बोलण्यात जाधवही अडकले. पुढे पत्नी असल्याचे सांगून पूजा नावाच्या महिलेसोबत ओळख करून दिली. दोघांनी कांजूर येथील एमएमआरडीएचे ४५ लाख किमतीचे घर २२ लाखांत मिळवून देणार असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे एमएमआरडीएच्या अंतर्गत असलेली गृहप्रकल्पाची इमारत दाखवून एकाच वेळी २२ लाख भरण्यास सांगितले. घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले. त्यानुसार त्यांनी बँक आणि नातेेवाइकांकडून १७ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज काढून कांबळेला दिले. पुढे काही महिन्यांनी एमएमआरडीएच्या गृहप्रकल्प योजनेअंतर्गत घर मिळवून देण्याकरिता ॲग्रीमेंटचे पेपरही हाती आले.
मात्र घराचा ताबा मिळत नसल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी कांबळेबाबत अधिक चौकशी करताच तो मुकादम नसल्याचे समजले. ही मंडळी पालिकेत नोकरी लावण्याचे आणि शासकीय घर मिळवून देण्याच्या नावाखाली गंडवत असल्याचे समोर येताच जाधव यांनी १२ जुलै रोजी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज सैंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत कांबळेला अटक केली. चौकशीत तो एन वॉर्डमध्ये कंत्राट पद्धतीने सफाई कामगार असल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कुंभारे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
तुमचीही फसवणूक झाली आहे का?
कांबळेने अशा प्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय पोलिसांना आहे. आतापर्यंत ४ तक्रारदार समोर आले आहेत. यात तुमचीही पालिकेत नोकरी अथवा शासकीय घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाली असल्यास शिवडी तसेच जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.