अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यानेच इमारतीला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 06:03 AM2018-12-04T06:03:47+5:302018-12-04T06:03:56+5:30
महालक्ष्मी येथील १८ मजली इमारतीला रविवारी लागलेल्या आगीनंतर, त्या इमारतीत अग्निसुरक्षेच्या संदर्भात खबरदारी घेतली नसल्याचे समोर आले आहे.
मुंबई : महालक्ष्मी येथील १८ मजली इमारतीला रविवारी लागलेल्या आगीनंतर, त्या इमारतीत अग्निसुरक्षेच्या संदर्भात खबरदारी घेतली नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई अग्निशमन दलाने या इमारतीला नोटीस बजावली आहे.
येथील केशवराव खाडे मार्गावरील सम्राट अशोक या अठरा मजली इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर रविवारी आग लागली होती. यात लक्ष्मीबाई कोळी (७०) यांचा मृत्यू झाला होता, तर स्थानिकांसह अग्निशमन दलाने ९७ रहिवाशांचे प्राण वाचविले होते.
दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने इमारतीची तपासणी केली असता, तेथील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले. स्प्रिंक्लेअर सीस्टिम, पॅनेल बोर्ड, फायर पंप, जॉकी पंप, बूस्टर पंपही कार्यान्वीत नव्हते. एकंदर अग्निसुरक्षाविषयक नियम पायदळी तुडविण्यात आले होते, अशी नोंद मुंबई अग्निशमन दलाने केली. परिणामी, या दुर्घटनाग्रस्त इमारतीला नोटीस बजाविण्यात आली आहे.