मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये पोषक आहाराचे वाटप करणाऱ्या महिला संस्था आणि बचतगटांना दीड वर्षापासून त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. याबाबत जाब विचारण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या स्वत: महापालिका मुख्यालयात मंगळवारी आल्या होत्या. त्यामुळे आयुक्त अजय मेहता यांनी तत्काळ दखल घेत रखडलेले वेतन देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यामुळे या महिलांना दिलासा मिळाला आहे.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहार देण्यात येतो. या आहाराचा पुरवठा २६० महिला संस्था आणि बचतगट संस्थांकडून केला जातो. मात्र यापैकी अनेक संस्थांचे बिल गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. याबाबत आयुक्तांबरोबर चर्चा करण्यासाठी अमृता फडणवीस आणि आमदार प्रवीण दरेकर पालिका मुख्यालयात मंगळवारी आले होते. नव्या निविदेसाठी महापालिकेने टाकलेल्या अटींमुळे महिला संस्था-बचतगट अडचणीत असल्याचेही फडणवीस यांनी आयुक्तांच्या समोर मांडले. या संस्था अपात्र ठरल्यास अनेक कुटुंबांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण होईल. अटींबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही केली़
सक्रिय राजकारणात उतरण्याचा मानस नाही...अमृता फडणवीस यांनी महिला बचतगटांच्या प्रश्नावर थेट महापालिका गाठल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र याबाबत विचारले असता, सामाजिक जीवनात जे मनापासून करावे असे वाटते तेच मी करते. घर सांभाळते यातच मला समाधानी आहे. त्यामुळे सक्रिय राजकारणात उतरण्याचा मानस सध्या तरी नाही. राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. त्यांचे सर्व प्रश्नही लवकरच सोडवले जातील. अंगणवाडी सेविकांचा रोजगार टिकवून ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विजयाचा विश्वास...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी मुंबईतील सहा जागांसाठीही मतदान झाले. या वेळेस मतदानाचा आकडा अधिक आहे, त्यामुळे निकालाबाबत काय वाटते, असे विचारले असता, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, मुंबईतही महायुतीच्या सर्वाधिक जागा जिंकून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़