मुंबई : मालाड येथील रहेजा टॉवर या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मल:निस्सारण वाहिनी साफ करण्याचे काम हे तिघे करत होते. गेल्या महिन्यातही मालाडमध्ये सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता.
मालाड पश्चिमेकडील राणी सती मार्ग, पिंपरीपाडा येथे खासगी बांधकामाच्या ठिकाणी मल:निस्सारण वाहिनी साफ करण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना ४० फूट उंचीच्या सेप्टिक टँकमध्ये तीन ते चार कामगार पडल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली.
ही घटना दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. त्यानंतर शोधकार्याला सुरुवात झाली. दोरखंडाच्या सहाय्याने जवान आत उतरले. त्यानंतर तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी रघु सोळंकी (५०) आणि जावेद शेख (३५) या दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. अकिब शेख (१९) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी मार्च महिन्यात मालवणी-मालाड अंबोजवाडी येथील सार्वजनिक शौचालयांच्या सेप्टिक टँकमध्ये तीन कामगार पडल्याची घटना घडली होती.
अशी घ्यावी लागते काळजी -
सेप्टिक टँक किंवा मॅनहोलची सफाई करताना पाणबुडे आत सोडले जातात. सेप्टिक टँक किंवा मॅनहोलची सफाई करताना काही टेस्ट केल्या जातात. टँक वा मॅनहोलच्या मुखावर ज्योत धरली जाते. ज्योत पेटली की आत गॅस असल्याचे समजते. त्यामुळे मास्क लावल्यानंतरच कामगाराला आत सोडले जाते. आत जाताना त्याच्या कमरेला पट्टा बांधला जातो. आत गेलेल्या कामगाराला अस्वस्थ वाटू लागल्यास तो पट्टा हलवून वरील पथकाला संकेत देतो. त्यानंतर त्याला लगेच बाहेर काढले जाते.