Join us

शिवसेनेला दुखवायचे नसल्याने बेस्ट संपाबाबत भाजपाने बाळगले मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 5:56 AM

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेला पटकायची भाषा केली होती.

मुंबई : एरवी मुंबईतील छोट्यामोठ्या समस्येवरून शिवसेनेवर निशाणा साधणारे भाजपा नेते सध्या कमालीचे शांत आहेत. बेस्टच्या संपामुळे सात दिवसांपासून मुंबईकरांना नित्याचा प्रवाससुद्धा जिकीरीचा झाला असला तरी मुंबईतील भाजपा नेते मात्र मौन बाळगून आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय बेस्ट संपाचे खापर तसेही शिवसेनेवर फुटत असताना उगाच बोलून अवलक्षण कशाला करा, असेच काहीसे धोरण पहारेकऱ्यांनी स्वीकारल्याचे चित्र आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टच्या वाहतूक विभागाचे कर्मचारी सध्या संपावर आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसतो आहे. एरवी महापालिकेशी संबंधित प्रत्येक समस्येवरून शिवसेनेला कोंडीत पकडून टीकेची झोड उठविणारे मुंबईतील भाजपा नेते या प्रकरणात मात्र शांत आहेत.दुसरीकडे बेस्ट संपाला भाजपाचीच फूस असल्याचा दावा काही शिवसेना नेते करत आहेत. शशांक राव यांना पुढे करून शिवसेनेला अडचणीत आणायचे आणि नमवायचे राजकारण सुरू असल्याचा दावा बेस्टशी संबंधित शिवसेनेचे नेते खासगीत बोलताना करत आहेत. जुन्याच प्रश्नांवर अचानक सुरू झालेला हा प्रकार संशयास्पद आहे. युतीच्या काळात शिक्षण, बेस्ट आणि सुधार समित्या शिवसेना आणि भाजपात वाटून घेतल्या जात होत्या. बेस्टची वस्तुस्थिती सगळ्यांना माहित आहे. कामगार नेत्यांच्या अवाजवी मागण्या मान्य केल्या तर किमान पन्नास टक्के भाडेवाढ करावी लागणार आहे. अशी भाडेवाढ झाल्यास पुन्हा शिवसेनेकडे बोट दाखवायला हे नेते मोकळे होतील, असेही या नेत्याने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.‘पडद्याआडून चुचकारा’भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेला पटकायची भाषा केली होती. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे युती गरजेची असल्याची जाणीव झाल्याने पडद्याआडून सेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच आशिष शेलार, सोमय्या या नेत्यांना शांत राहण्यास सांगितले आहे.

टॅग्स :बेस्टशिवसेनाभाजपा