एक वर्ष इंटर्नशिप करून डॉक्टर बना; काम वा अभ्यास करण्याची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:06 AM2023-11-24T10:06:32+5:302023-11-24T10:07:09+5:30
‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : युद्ध वा कोविडसारख्या कारणांमुळे परदेशातील वैद्यकीय शिक्षण शेवटच्या वर्षात सोडाव्या लागणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांना, खासकरून युक्रेन आणि फिलिपाइन्समधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टर म्हणून नोंदणी करून काम वा अभ्यास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
परदेशी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भारतातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या समतुल्य अभ्यासक्रम ऑफलाइन पद्धतीने १ वर्षाच्या इंटर्नशिपसह किंवा त्याशिवाय पूर्ण केल्यास त्यांना भारतात संबंधित वैद्यकीय परिषदेकडून तात्पुरती नोंदणी करता येईल. त्यानंतर कम्पलसरी रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिपच्या नियम, २ नुसार १ वर्षाची इंटर्नशिप बंधनकारक राहील. शेवटच्या वर्षात काही कारणांनी ब्रेक घेऊन जे भारतात परतले, त्यांनी परदेशातील आपला अभ्यासक्रम आणि परीक्षा ऑनलाइन दिली अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. युक्रेन युद्ध, कोविड अशा विविध कारणांमुळे परदेशात विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यावर थांबले होते. खासकरून शेवटच्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला.
सहानुभूतीने विचार करण्याची विनंती
n तीन-चार वर्षे परदेशात शिक्षणासाठी घालवल्यानंतर शेवटचे वर्ष असे अनिश्चिततेत गेल्यानंतर ना धड परदेशात ना धड भारतात काम करता येत होते. अशा विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे आपल्या अडचणींचा सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंती केली होती.
n वैद्यकीय शिक्षणाचे नियमन करणाऱ्या एनएमसीने काही अटी-शर्थी घालत या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ही संधी एकदाच घेता येईल आणि विद्यार्थ्यांना आपले अर्ध्यावर थांबलेले अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.
n पुढे तीन महिन्यांच्या आत हस्तांतरण, स्थलांतर याबाबतच्या पर्यायाची निवड विद्यार्थ्यांना करायची आहे, असा खुलासा एनएमसीने केला आहे. पुढील १० वर्षांच्या मुदतीत संबंधित विद्यार्थ्यांना पुढील परीक्षाही देता येतील. अर्थात ज्यांना परदेशात जाऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, त्यांना तीही मुभा असेल. अशा विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून
पदवी मिळेल.