समाज, राष्ट्राच्या सेवेसाठी व्हा सरकारी अधिकारी; गुणगौरव समारंभात तज्ञांचा विद्यार्थ्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 07:32 PM2023-01-08T19:32:06+5:302023-01-08T19:33:11+5:30
प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या व विशेष प्राविण्य असलेल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याचे आवाहन केले.
मुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन उच्च पदांवर जाता येते आणि या पदांवर पोहचल्यावर आपल्याला एक अधिकारी म्हणून समाजाची व देशातील कोट्यावधी जनतेची प्रामाणिकपणे सेवा करू शकतो असे मत स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी व्यक्त केले. घाटकोपर येथील लाडशाखीय वाणी समाज मंडळ व अविष्कार महिला मंडळ, संस्कार वाणी युवा मंडळ यांच्या वतीने पी एन दोशी वुमेन्स एसएनडीटी कॉलेज ऑडिटोरियम येथे आयोजित गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
या गुणगौरव समारंभात शालेय तसेच दहावी ,बारावी ,सीईटी, जेईई विविध पदवी व पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आला. या शिवाय अंकिता नेरकर यांची नगर रचना विभागात वर्ग १ अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तर डॉ केतन पाखले यांनी केंद्र शासनाच्या वैद्यकीय उपक्रमात विशेष कामगिरी केल्याबद्दल ही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष योगीराज वाणी तर प्रमुख अतिथी म्हणून पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजचे संस्थापक निलेश छडवेलकर होते.
या कार्यक्रमात बोलताना प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या व विशेष प्राविण्य असलेल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी त्यांचे करिअर गुणांवर न ठरवता आपल्यातील क्षमता ओळखून करिअर ठरवावे त्याचवेळी जिद्द चिकाटी आणि समर्पण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात आपले ध्येय गाठू शकतो असे मार्गदर्शनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निलेश छडवेलकर यांनी लहान वयात पोलिओमुळे अपंगत्व आले तरी जिद्दीने उभे राहून मराठी भाषेतील पहिला डिजिटल विश्वकोश तयार केला. अपंगत्वावर मात करत सॉफ्टवेअर प्रोसेसिंगच्या माध्यमातून आपल्या अपंगत्वांने खचून न जाता केलेला संघर्ष कथन केला . अध्यक्ष योगीराज वाणी यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात समाजातील गुणवंत, यशवंत व्यक्ती यांना सातत्याने प्रेरणा देण्याचे काम लाडशाखीय वाणी समाज मंडळ करीत असल्याची प्रतिक्रिया दिली.