मुंबई : आता नोकरी करत इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे. नोकरीमुळे शिक्षण अर्धवट सुटलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना नोकरी सोडण्याची गरज राहणार नाही. यंदा प्रथमच वर्किंग प्रोफेशनल्ससाठी अभ्यासक्रमांना सुरुवात होत असून, सीईटी सेलकडून पुढील आठवड्यापासून याची प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.
इंजिनिअरिंग, बीटेक, एमई, एमटेक, एमसीए आणि एमबीए या अभ्यासक्रमांसाठी वर्किंग प्रोफेशनल्ससाठी कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. त्यानुसार राज्यामध्येही यंदापासून वर्किंग प्रोफेशनल्ससाठी अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. त्याची तयारी सीईटी सेलने सुरू केली असून, प्रवेशप्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यातून नोकरी सांभाळून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे. केंद्र किंवा राज्य सरकार, खासगी नोंदणीकृत कंपन्यांमध्ये काम करत असलेले कर्मचारी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकणार आहेत. तसेच या कंपन्यांमध्ये एक वर्षाचा नोकरीचा अनुभव असलेले प्रवेशासाठी पात्र असतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विद्यार्थी नोकरी करीत असलेल्या ठिकाणापासून शिक्षण संस्था ५० किमी अंतरावर असण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, अशाप्रकारे अभ्यासक्रम राबविण्यास अनेक शिक्षण संस्थांनी तयारी दर्शविली आहे. तसेच हे अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यातून कर्मचाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत होण्यासही मदत मिळणार आहे.
कामावरून कॉलेजला
हे अभ्यासक्रम कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त चालविले जाणार आहेत. कामावरून सुटल्यावर सायंकाळी अथवा सुट्ट्यांच्या दिवशी या अभ्यासक्रमांचे वर्ग भरतील. त्यातून नोकरी करत शिक्षण घेणे शक्य होणार आहे.