मुंबई – कोरोनाशी लढताना फ्रंटलाइनवर असणाऱ्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे सुरक्षेचे आव्हान राज्यासमोर आहे. ग्रामीण भागासह शहरातही कोरोनाशी लढणाऱ्या वाॅरियर्सना सुरक्षा किट्सचा अभाव असल्याची चिंताजनक स्थिती सर्वत्र आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने आता आर्थिक सहाय्यासाठी सामान्यांना आवाहन केले आहे.
राज्यभरातील खासगी डॉक्टरांची एन 95 मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह ईक्यूपमेंट किट) किटची गरज पूर्ण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. त्यानुसार ही अत्यावश्यक साधन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी निधी उभारण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रने घेतला आहे.
कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीई किट अत्यंत आवश्यक आहे. पण, सध्या साठेबाजीमुळे एन९५ मास्क आणि सॅनिटायझर्सचा तुडवडा आहे. तर यांच्या किंमतीतही कृत्रिम वाढ झाली आहे. त्याचवेळी सर्वात महत्वाच्या महत्त्वाच्या पीपीई किटची उपलब्धताच कमी असून ह्याच्याही किमती खासगी डॉक्टरांना परवडत नसल्याचे आयएमए, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे. सरकारी डॉक्टरांप्रमाणे खासगी डॉक्टरांनाही मोफत आणि माफक दरात ही साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सरकारकडे सातत्याने आम्ही करत आहोत. पण, ही मागणी काही मान्य होत नसून आता आमच्यावरच कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यामुळे आता यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही या साधनांच्या खरेदीसाठी निधी उभारण्याचा निर्णय घेतल्याचेही डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच या निधी जमा करण्याच्या कामाला सुरुवात होणार असून याला प्रतिसाद मिळाल्यास नक्कीच खासगी डॉक्टरांना मोठी मदत होईल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.
..................................................
निवासी डॉक्टरांचेही सामान्यांना साकडे
केईएम रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनीही डॉक्टरांना सुरक्षाकवच मिळावे यासाठी सामान्यांना आवाहन केले असून याविषयी फेसबुक व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले जात आहे. गेले कित्येक दिवस कामाच्या अनिश्चित वेळा, ताण अशा विविध पातळ्यांचे आव्हान पेलून डॉक्टर आपली जबाबदारी निभावत आहेत, मात्र बऱ्याच ठिकाणी सुरक्षा किट्स उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी अशा प्रकारे स्वतः पुढाकार घेत आर्थिक सहाय्यासाठी साकडे घातले आहे.