मुंबई : एका पोलिसाने 'पोलीस' बनूनच व्यापाऱ्याला गंडा घालण्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष २ने पोलिसासह चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
योगेश लाड (४३), कुंदन कदम (५०), ज्ञानेश्वर कुंटे (५१) आणि चंद्रकांत गवारे (५२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील गवारे हा माजी पोलीस अधिकारी आहे. त्याचा बोरिवलीतील अपहरण आणि दरोड्यात सहभाग उघड झाल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आले होते. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची ओळख पटली आणि कांदिवली, नालासोपारा व बोरिवली परिसरातून चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
अटकेच्या भीतीने दिले पैसे
याप्रकरणी पायधुनी परिसरात प्रोव्हिजन स्टोअर्स चालविणाऱ्या व्यावसायिकाने तक्रार केली होती. गवारे हा त्याच्या अन्य साथीदारांसह त्यांच्या दुकानात गेला. त्याच्या हातात हातकडी, तोंडावर मुंबई पोलिसांचा लोगो असलेला मास्क होता. क्राईम ब्रँचमधून आल्याचे सांगत व्यापारी त्याने मोजत असलेले पैसे चुकीच्या व्यवसायातून आल्याचा आरोप त्यांच्यावर केला. अटकेच्या भीतीने घाबरलेल्या व्यापाऱ्याने त्यांना १ लाख दिले जे घेऊन ते मोहम्मद अली रस्त्याच्या दिशेने निघून गेले. पुढे त्याला ते बोगस असल्याची माहिती मिळाली आणि हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपायुक्त निलोत्पल आणि कक्ष २चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली हा तपास करण्यात आला.