Join us

बापरे! मुंबईच्या नाल्यात हे काय सापडलं? मुंबईकर जरा याकडेही लक्ष द्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 11:29 AM

कुर्ला वेस्ट परिसरात पावसामुळे एलबीएस मार्गावर पाणी साचलं होतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं.

मुंबई - दरवर्षी शहरात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचते. याचं प्रमुख कारण सांगितले जाते ते म्हणजे परिसरातील नाले सफाई न केल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. मात्र नालेसफाई दरम्यान त्यातून निघणारा कचरा पाहिला तर प्रशासनाला दोष देण्याआधी मुंबईकरांनी स्वत:ही आपल्याकडे पाहायला हवं असचं वाटतं. नालेसफाई दरम्यान नाल्यात गादी, बेड, टेबल अशा वस्तू फेकल्याने नाले चॉकअप होतात. त्यामुळे पाणी काढणं कठीण होऊन जातं. 

कुर्ला वेस्ट परिसरात पावसामुळे एलबीएस मार्गावर पाणी साचलं होतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र रविवारी मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या नाल्याची सफाई केली त्यावेळी त्यातून 10 गाद्या, बेड, कपाटाचे तुकडे अशा वस्तू बाहेर काढल्या. त्यामुळे नाले चॉकअप व्हायला महापालिका जेवढी जबाबदार आहे त्याहून अधिक जबाबदार या नाल्यात अशा वस्तू टाकणारे मुंबईकर जबाबदार आहेत. 

बीएमसी एल वार्डचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळूंज यांनी सांगितले की, रस्त्यावर पाणी साचलं तर लोकं बीएमसीला दोषी ठरवतात. मात्र नाल्यात अशाप्रकारे फर्निचर, वस्तू टाकताना विचार केला जात नाही. लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी यासाठी वाळूंज यांनी नालेसफाईचे फोटो काढले आहेत. हे फोटो पाहून तरी लोकांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनेकदा नाले सफाईच्या कामात ठेकेदारांनी कामचुकारपणा केल्याचा आरोप होत असतो. महापालिकेनेही ठेकेदारांचा हा कामचुकारपणा उघड करण्यासाठी लोकांना विविध माध्यमातून तक्रार करण्याची संधी दिली आहे मात्र अशाप्रकारे लोकांकडून नाल्यात घाण टाकली जात असेल तर दोष कोणाला द्यायचा हा प्रश्न उभा राहतो. 

मुंबईत महापालिकेच्या २४ वॉर्डात मुंबईच्या ९४ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने प्रत्येक शनिवारी आणि रविवार स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेत स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिका कर्मचारी असं २०० जणांचं पथक प्रत्येक वॉर्डात साफसफाई करत आहेत. या मोहिमेअंतर्गत झोपडपट्टी परिसर, नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये पोलीस आणि पालिका कर्मचारी मोठ्या साफसफाई मोहिम राबवत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत क्लिन-अप मार्शल आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाल्यात, उघड्यावर घाण टाकणारे, थुंकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर आता मुंबई पोलीस थेट पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम २२ व नियम ११५ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली होती.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकुर्लानगर पालिका