लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही पालिका प्रशासनाने तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज केली आहे. मात्र, त्याचबरोबरीने पावसाळ्याचा काळ पाहता साथीच्या आजारांसाठी पालिका रुग्णालयात खाटा आरक्षित करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली. त्यामुळे नाॅन कोविड रुग्णांची गैरसोय होणार नाही, याकडेही लक्ष देण्यात येत आहे.
सायन रुग्णालयाचा काही भाग दुरुस्तीसाठी बंद आहे. मात्र, या रुग्णालयात कोविड आणि साथीचे आजार अशा दोन्हींसाठी खाटांची व्यवस्था केली आहे. सध्या या रुग्णालयात केवळ १०० कोरोना रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
याविषयी पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, कोविड रुग्णांची संख्या वेगाने खाली येत आहे. मोठ्या कोविड केंद्रांमध्येही अत्यल्प प्रमाणात रुग्ण उपचाराधिन आहेत. गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रात ३००हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नायर रुग्णालयात ५०० खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित होत्या, मात्र साथीच्या आजारांमुळे ही संख्या ३०० खाटांची करण्यात आली.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, साथीच्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, याकडे लक्ष देण्यात येत आहे. उपाययाेजनांच्या दृष्टीने तयारी करण्यात येत असून, या नाॅनकोविड रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावेत, यासाठीही खाटांची तरतूद, औषधांचे व्यवस्थापन सुरू आहे.
* लेप्टोपासून सावध राहा
अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. या पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गित होतात. अशा बाधित पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या पायाला किंवा शरिराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याशा जखमेतूनसुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत.
- डॉ. मंगला गोमारे,
कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका
--------------------------