मुंबई : महाराष्ट्रचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माजी पत्नी करुणा शर्मा यांच्या मुंबईमधील सांताक्रूझ येथील घरात बीड पोलिसांचे पथक बुधवारी सकाळी दाखल झाले. सहायक पोलीस आयुक्त सुनील जायभाये हे या पथकाचे नेतृत्व करीत आहेत.
बुधवारी सकाळी हे पथक सांताक्रूझ पोलीस ठाण्यात दाखल झाले. शर्मा यांच्या सांताक्रूझमधील घराची झडती हे पथक घेणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यात आवश्यक असलेल्या सर्व कागदोपत्री प्रक्रिया बुधवारी पूर्ण करण्यात आल्या. तसेच याच प्रकरणात पथकाने बोरिवलीमध्येही भेट दिल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले. रिव्हॉल्व्हर प्रकरणात करुणा यांना बीड पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई तपास सुरू केला आहे. याप्रकरणी जायभाये यांना संपर्क करण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. मात्र त्यांनी याप्रकरणी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. त्यानुसार गुरुवारी करुणा यांच्या घराची झडती पोलीस घेणार असून, याबाबत अधिक खुलासा होईल.