मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज्यातील आंदोलने, जलयुक्त शिवार, दुष्काळ, वीज पुरवठा, यांसह विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी, नगर-बीड-परळी रेल्वे लाईनसंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर उत्तर देताना, 2019 च्या शेवटपर्यंत बीडपर्यंतरेल्वेलाईन पोहोचेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमत वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज्यातील अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली. याच कार्यक्रमात नगर-बीड-परळी या रेल्वेलाईनसंदर्भातही त्यांनी माहिती दिली. नगर-बीड-परळी रेल्वेलाईनची घोषणा 15 वर्षापूर्वी झाली होती. गेल्या 3 वर्षात संपूर्ण जमिन अधिग्रहण आम्ही केलं. सगळे टेंडर आम्ही काढलं, त्याचं कामही आम्ही सुरू केलं. आता, 2019 पर्यंत बीडपर्यंत रेल्वेलाईन सुरू होईल हे नक्की, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच कार्यक्रमात स्पष्ट केलं. तसेच ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा झाली असून त्याचे कार्यालयही सुरू झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरच हे महामंडळ सुरू झाल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.