Join us

बीडची बुुरखाधारी मोबाइल चोर जेरबंद

By admin | Published: March 26, 2017 5:51 AM

लोकलमधल्या गर्दीत बुरख्याचा आधार घेत मोबाइल चोरी करणाऱ्या बीडच्या सराईत

मुंबई : लोकलमधल्या गर्दीत बुरख्याचा आधार घेत मोबाइल चोरी करणाऱ्या बीडच्या सराईत महिला चोराचे बिंग निर्भया पथकाने फोडले. सुनीता जानू (३०) असे महिला चोराचे नाव असून, तिच्याकडून साडीत लपविलेले पाच मोबाइल जप्त केले आहेत.मूळची बीडची रहिवासी असलेली सुनीता मुंबईतले चर्चगेट, सीएसटी, दादर, अंधेरी, वांद्रे, घाटकोपर, बोरीवली, कुर्ला यांसारखी गर्दीची रेल्वे स्थानके गाठते. यापूर्वी तिला अटक झाली होती. त्यामुळे तिने बुरख्याचा आधार घेत मोबाइल चोरी सुरू केली. गेल्या काही दिवसांत पश्चिम रेल्वेवर मोबाइल चोरीच्या तक्रारी वाढत असल्याने निर्भया पथकातील पोलीस नाईक मीनल गिरी यांच्या टीमने याचा अधिक तपास सुरू केला. त्यानंतर सुनीता मुंबई सेंट्रल येथे येणार असल्याची माहिती गिरी यांना मिळाली.त्यानुसार एपीआय जी. बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरी यांच्या पथकाने सापळा रचला. त्यात एका बुरखाधारी महिलेच्या संशयास्पद हालचाली त्यांनी हेरल्या. तिचा चेहरा दिसत नसल्याने महिलेची थेट चौकशी करणे शक्य नव्हते. त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. अखेर बराच वेळाने सुनीता चेहऱ्यावरचा बुरखा हटवताच गिरीने तिला ताब्यात घेतले. तिच्या झडतीतून पाच मोबाइल जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)