Join us

मधमाशांमुळे वाढतेय पिकांचे उत्पादन; जनजागृती निर्माण करण्याची गरज- डॉ. सी. एस. पाटील

By स्नेहा मोरे | Published: January 19, 2024 6:39 PM

नरिमन पाॅइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

मुंबई - आपल्या आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात पाच टक्क्यांपासून ते तब्बल ४० टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापिठाचे विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले.

नरिमन पाॅइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यात सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथील स्वाती गुरवे ठाणे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र कोसवाड येथील उत्तम सहाणे सहभागी झाले होते. मधमाशांमुळे पिकांच्या उत्पादनांची गुणवत्ता राखून उत्पन्न अधिक पौष्टिक होते असेही संशोधनात पुढे आले आहे.

किडनाशकांचा अतिरेकी वापर मधमाशांसाठी घातक ठरत आहेच पण त्याशिवाय मधामध्ये किडनाशकांचा अंश आढळून येत आहे हे जास्त धोकादायक आहे. किडनाशक मंडळाने ३२९ किडनाशके प्रमाणित केली आहेत, तीच शेतक-यांनी वापरावीत. किडनाशकांमुळे मधमाशा नाहीशा होत आहेत. त्यांना वाचवायचे असेल तर किडनाधकाचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळावे असेही पाटील यांनी अधोरेखित केले. यावेळी स्वाती गुरवे यांनी विविध फळे, भाज्या, धान्य, तेलबिया, इतर पिकांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया होते. निसर्गाचा जैविक समतोल साधण्याची किमया परागीभवनात असते. यात सर्वात जास्त हातभार हा मधमाशांचा लागतो.

मधमाशांच्या संवर्धनासाठी फुले देणाऱ्या झाडांची लागवड करावी. मधमाशांना आकर्षित करणाऱ्या पिकांची लागवड करून शेतात किमान एक मधमाशी वसाहत असावी अशी व्यवस्था केली पाहिजे. शेतातील मधमाशींच्या पोळ्याचे संगोपन केले पाहिजे. प्रतिकूल हवामान असल्यास मधमाशी पेट्यांची काळजी घेण्याची गरज आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले. उत्तम सहाणे यांनी मधमाशीचे पोळे नष्ट करणे म्हणजे त्या शेत शिवारातील उभे पिक नष्ट करण्यासारखे आहे, असे सांगितले. तर आग्या पोळ्यामध्ये पन्नास हजार ते एक लाख मधमाशा असतात. जाळ करून किंवा धूर करून माशा उडवल्या आणि मध काढला तर २५ एकर मधील जंगल नष्ट होते. त्यामुळे मध काढण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबवावी. मधाच्या पोळ्यामध्ये मध असलेला भाग फुगीर होतो. तेवढा भाग वेगळा काढून आपण मधमाशीचे पोळे वाचूवू शकतो. पुन्हा ते पोळे पूर्ववत लावल्यास बाहेर गेलेल्या माशा त्यावर परत येतात, असेही ससाणे यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले.

टॅग्स :शेतकरी