Join us

बोरिवलीत मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 4:25 PM

बोरिवलीत मधमाशी चावल्याने ५५ वर्षीय पंकज मफतलाल शहा यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणी बोरिवलीकरांमध्ये दहशत पसरवणारा व्हॉट्स अॅपवर मेसेज देखील व्हायरल झाला आहे.

मुंबई - बोरिवलीत मधमाशी चावल्याने ५५ वर्षीय पंकज मफतलाल शहा यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शहा हे बोरिवलीतील वीर सावरकर गार्डनमध्ये फेरफटका मारायला गेले होते. त्यावेळी शहा यांना मधमाश्या चावल्याने ते जखमी झाले त्यांना उपचाराकरिता एलआयसी कॉलनी रोडवरील करुणा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान शहा यांचा मृत्यू झाला. याबाबत बोरिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच या सर्व प्रकरणी बोरिवलीकरांमध्ये दहशत पसरवणारा व्हॉट्स अॅपवर मेसेज देखील व्हायरल झाला आहे. मात्र मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. 

मयत पंकज शहा हे बोरिवलीतील सोडवला लेन येथील  प्लिजंट पॅलेस बिल्डिंगमध्ये राहत होते. नेहमीप्रमाणे ते वीर सावरकर गार्डनमध्ये फेरफटका मारण्यास गेले असताना हि दुर्दैवी घटना घडली. त्याचप्रमाणे मधमाश्या चावल्याने जखमी झालेल्या रामानुज दाद (३२) आणि मेरिस्ता रॉन्गविला (४६) या दोघांवर  करुणा  रुग्णालयात उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले असल्याची माहिती करुणा रुग्णालयाकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त तक्रारीनंतर गार्डन आणि कीटक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीर सावरकर गार्डनला भेट दिली आणि आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी व्हॉट्स अॅपवर मेसेज व्हायरल झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. या मेसेजद्वारे मृतांचा आकडा वाढवून पसरविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :मुंबईबातम्या