‘लाडकी बहीण’ आधी; नव्या कामांना निधी नाही! नवी कामे हाती न घेण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 06:12 AM2024-08-02T06:12:21+5:302024-08-02T06:13:45+5:30
‘माझी लाडकी बहीण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू
मनोज मोघे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. यासाठी ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे; मात्र ही योजना मार्गी लागेपर्यंत कोणत्याही विभागाकडून नवीन कामांना निधी मिळणार नसल्याच्या सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून विभागांना देण्यात आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून दर महिन्याला १५०० रुपये गरजू महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. आतापर्यंत सुमारे दीड कोटी महिलांनी अर्ज दाखल केले असून, ही लाभार्थ्यांची संख्या अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यास वित्त विभाग कामाला लागला आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही कामांना सध्या निधी उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
देयके रखडली
योजनांमागून योजना जाहीर होत आहेत; मात्र यासाठी निधीची तरतूद केली जात असताना सध्या सुरू असलेल्या विकासकामांची देयकेही थकली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची एक बैठक गुरुवारी सचिव मनीषा म्हैसकर यांच्या दालनात पार पडली. या बैठकीदरम्यान थकलेल्या देयकांचे पैसे लाडकी बहीणचा पहिला हप्ता १९ ऑगस्ट रोजी जमा झाल्यानंतरच दिली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वित्त विभागाकडून हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईपर्यंत सर्व देयकांच्या फायलीही थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पुढील आदेशापर्यंत थांबा, थोडा धीर धरा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडून सर्व अधिकाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत. १ ऑगस्टपासून कोणतीही नवी कामे हाती घेऊ नयेत, असे यात नमूद करण्यात आल्याचे बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. लाडकी बहीण योजना सुरळीत मार्गी लागत नाही तोपर्यंत पुढील आदेशांची वाट पाहण्यासही सांगण्यात आले आहे.
‘माझी लाडकी बहीण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी आतापर्यंत एक कोटी ३८ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. आता या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा केला जाणार आहे. मात्र जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे. त्यामुळे महिलांना केवळ एक रुपया मिळणार अशा सुरू झालेल्या अपप्रचारावर महिलांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असेही आदिती तटकरे यांनी सांगितले.