मुंबई : मागील लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी चांदिवलीसह लगतच्या परिसरातील प्रदूषण कमी करणार असल्याच्या आश्वासनांची खैरात करत मते मागितली होती. प्रत्यक्षात मात्र चांदिवलीतील प्रदूषणाचे प्रमाण पाच वर्षांत कितीतरी पटीने वाढले आहे. परंतु, राजकीय नेत्यांना येथील प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन आहेत. तत्पूर्वी येथे प्रिया दत्त खासदार होत्या. गेल्या दहा वर्षांतील प्रदूषणावर माहिती देताना चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक मनदीप सिंग मक्कर यांनी सांगितले की, गेल्या दहा नाही, परंतु पाच वर्षांत पवई, चांदिवली परिसरातील प्रदूषण वाढले आहे. येथील आरएमसी प्लांट वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत आहेत. तसेच पवईमधल्या खैरानी रोडवरही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते आहे.
लोखंड किंवा भंगार वितळविणाऱ्या भट्ट्यांतून येथे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे स्थानिकांचा श्वास कोंडला आहे. पाच वर्षांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार आले, मते मागितली. मात्र, प्रदूषण कमी करण्याबाबत कोणालाही कायमस्वरूपी उपाययोजना करता आलेली नाही, ही खंत आहे. खासदार असो किंवा आमदार असो. लोकप्रतिनिधींनी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला पाहिजे.
रस्त्यावर पाणी मारून हवेत उठणारी धूळ कमी करत प्रदूषण कमी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही तात्पुरती उपाययोजना आहे. आजही मुंबईतील पूर्व उपनगरातील मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील प्रदूषणाचा प्रश्न जटिल आहे.
वांद्रेत प्रदूषणाचे मोजमाप करणारी यंत्रणा पण...
वांद्रे पूर्वेकडील कलानगर परिसरात प्रदूषण मोजणारी यंत्रणा सिग्नलवर लावली असली तरी प्रदूषण कमी करण्यास हातभार लावता आलेला नाही. केवळ कलानगर सिग्नल नाही, तर कुर्ला पश्चिमेकडील कमानी सिग्नलही प्रदूषणाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे तेथील स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
केंद्राकडून मदत मिळूनही प्रश्न ‘जैसे थे’ -
१) आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होत असलेल्या अहवालात मुंबई सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात आली आहे.
२) वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, कुर्ला, चांदिवली, सायनसारख्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सातत्याने खालावत असतो.
३) हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारावा म्हणून केंद्राकडून मदत मिळते किंवा उपक्रम राबविले जातात. मात्र, प्रदूषण कमी होत नाही.
नाकातोंडात धूळ -
लालबहादूर शास्त्री मार्गावर मेट्रो ‘२ ब’ चे काम सुरू असून, कुर्ला डेपो आणि कल्पना सिनेमा परिसरात सातत्याने रस्त्यांची कामे सुरू असतात. त्यामुळे उडणारी धूळ प्रवाशांच्या नाकातोंडात जात आहे.
मेट्रो, बुलेट ट्रेनचीही कामे कारणीभूत-
वांद्रे-कुर्ल्यातील व्यापार केंद्राचा संपूर्ण परिसर धुळीने माखलेला असतो. बीकेसीमध्ये वाहनांची भर सातत्याने पडत असून, मेट्रो आणि बुलेट ट्रेनचे कामही येथे सुरू आहे. यातून उठणाऱ्या धुळीने बीकेसीला प्रदूषणात लोटले आहे.