Join us

नालेसफाईवर उपायुक्तांचा वॉच; दररोज दोन वेळा पाहणी करा, आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:54 IST

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांमधून गाळ काढण्याचे सुरू असलेले काम ५ जूनपर्यंत पूर्ण करावे.

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांमधून गाळ काढण्याचे सुरू असलेले काम ५ जूनपर्यंत पूर्ण करावे. त्यासाठी रेल्वे, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांसह विविध विभागांशी समन्वय साधावा. आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामाला वेग द्यावा. परिमंडळाचे उपायुक्त, सहायक आयुक्त यांनी दररोज सकाळ, सायंकाळी विभागात प्रत्यक्ष कार्यस्थळी भेटी देऊन पाहणी करावी. पाणी साचण्याच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

पालिका हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली. यावेळी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालिका कार्यक्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्यांतून गाळ काढण्याची कामे जलद गतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम लवकर पूर्ण करावे व विहित मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्यादृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

‘त्या कचऱ्याची विल्हेवाट लावा’-

१) नाल्यालगतच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांकडून नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्याबाबतच्या तक्रारी असल्या तरीदेखील तरंगत्या कचऱ्याची (फ्लोटिंग मटेरियल) योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, असे गगराणी यांनी सुचविले. 

२) नाले तुंबता कामा नयेत, याची दक्षता घेतानाच तरंगत्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. अरुंद नाल्याच्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’चा वापर करावा. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांचा सहयोग घ्यावा. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही गाळ उपशाच्या कामाची पाहणी करावी, असेही गगराणी यांनी नमूद केले.

‘पाणी उपसा करण्यासाठी पंप बसवा’-

पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळांखालील व इतर ठिकाणीदेखील बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामे देखील समाविष्ट आहेत. रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, अशा सूचनाही गगराणी यांनी केल्या.

टॅग्स :मुंबईनगर पालिकामोसमी पाऊस