Join us

"नारायण राणेच्या नावापूर्वी आत्ता केंद्रीयमंत्री उच्चारलं, त्याचं श्रेयही बाळासाहेबांचंच"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 8:22 PM

विधिमंडळातील तैलचित्र अनावरण सोहळ्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावली होती.

मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी एक भावनिक पत्र लिहित बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर, विधीमंडळातील तैलचित्र अनावरण प्रसंगीही नारायण राणेंनी बाळासाहेबांसोबतच्या आपल्या आठवणी जागवल्या. कोकणातून मुंबईला जगायला आलेल्या एका मुलाला शिवसैनिक, शाखाप्रमुख, नगरसेवक ते राज्याच्या मुख्यमंत्री केलं ते बाळासाहेबांनीच, असे म्हणत राणेंनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणी सांगितल्या. 

विधिमंडळातील तैलचित्र अनावरण सोहळ्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. याप्रसंगी अनेक नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही बाळासाहेबांचं व्यक्तीमत्त्व समजावून सांगितलं. त्यानंतर, नारायण राणेंनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक घटना आणि प्रसंग सांगितले. मी २००५ साली शिवसेना पक्ष सोडून गेलो, अर्थात जाताना बाळासाहेबांना सांगून गेलो होतो. मात्र, तरीही दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेबांनी फोन केला. नारायण उठला का, असं विचारलं, मी होय सर म्हटलं. त्यानंतर, ते म्हणाले, चल परत येतो का?... बाळासाहेबांच्या त्या प्रश्नावर मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही. मी गप्प होतो, मग बाळासाहेबांनी ओके म्हणत फोन ठेऊन दिला, अशी आठवण नारायण राणेंनी सांगितली. बाळासाहेंबाच्या मनाचा मोठेपणा, दिलदारपणा, मराठी बाणा हाच आम्हा शिवसैनिकांना प्रेरणा द्यायचा. त्यामुळेच, त्यांच्या एका हाकेला ओ देत शिवसैनिक एकत्र यायचा, आजच्या शिवसेनेत तसा आवाज राहिला नाही, असेही राणेंनी म्हटले, 

बाळासाहेब असते तर आज महाराष्ट्राचा राजकीय इतिहास वेगळा असला असता, कोकणातून मुंबईला आलेला मी साधा एक शाखाप्रमुख ते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनलो. आत्ता, मी भाषणाला येण्यापूर्वी माझ्या नावापूर्वी एक शब्द उच्चारला केंद्रीयमंत्री, त्याचं श्रेयही केवळ बाळासाहेबांनाच आहे, असे म्हणत नारायण राणेंनी बाळाासाहेबांमुळे मला अपेक्षापेक्षा जास्त मिळाल्याचं सांगितलं. ज्या बाळासाहेबांनी मला घडवलं त्यांचं ऋण मी याजन्मी तरी फेडू शकत नाही, अशा शब्दात नारायण राणेंनी भावना व्यक्त केल्या

टॅग्स :नारायण राणे शिवसेनाउद्धव ठाकरेअजित पवार