"गणपती बाप्पाच्या आगमनाआधी...", उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले आता जगाला समजू द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 08:39 PM2022-07-24T20:39:40+5:302022-07-24T20:40:13+5:30
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा जोर सुरू केला असून दुसरीकडे आदित्य ठाकरे राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत.
मुंबई-
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा जोर सुरू केला असून दुसरीकडे आदित्य ठाकरे राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखेच्या उदघाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना बंडखोर आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. तसंच गणपती बाप्पाकडे एक साकडं देखील घातलं.
"शिवसेना संपली असं म्हणणाऱ्यांनी जरा एकदा इथं पाहावं. आज इथं उपस्थित असलेले कार्यकर्ते माझी ताकद आहेत. 'वर्षा'वरुन निघालो असलो तरी मातोश्री परतल्यानंतर मला माझी खरी शक्ती मिळाली आहे. शिवसैनिक ही माझी खरी ताकद आहे. आज अरविंद सावंत यांना किशोरी पेडणेकर यांनी गणपती बाप्पाची मुर्ती भेट म्हणून दिली. गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे. मी गणरायाकडे साकडं घालतोय की तुझ्या आगमनाआधी हे संकट आणि आरिष्ट्य मोडून शिवसेनेचा भगवा पुन्हा महाराष्ट्रावर फडकू देत. आता खरा भगवा कोणता हे दाखवण्याची वेळ आली आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"शिवसेनेची ताकद काय आहे ते आता जगाला समजू द्या. माझ्या वाढदिवसाला मला पुष्पगुच्छ भेट म्हणून नकोत. तुमच्या सह्यांचे शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे माझ्याकडे आले पाहिजेत. हेच माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट मी समजेन", असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं.
...तर तेव्हाच तुमच्या कुठल्यातरी दगडाला शेंदूर लागला असता
उद्धव ठाकरे यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदावरुन केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. "विधानसभा निवडणुकीवेळी जे ठरलं होतं ते जर केलं असतं तर आज तुम्हाला मनावर दगड ठेवून आज जे करायला लागलं आहे. ते झालं नसतं आणि कोणत्यातरी भाजपाच्या एका दगडाला अडीच वर्षासाठी शेंदूर लागला असता. आज तुमच्या मनावर दगड पडलेला आहे. मग तेव्हा का नाही सांगितलं की हेच आमचं ठरलेलं होतं", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आजचा प्रयत्न शिवसेना फोडण्याचा नव्हे, संपवण्याचा!
"अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आजचा जो प्रयत्न आहे तो फोडण्याचा नाही, तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नातं त्यांना तोडायचं आहे. पण नातं जर तोडायचं असेल तर हे जे आज स्वत:ला मर्द समजत आहेत. हे बंडखोर नाहीत ते हरामखोर आहेत. त्यांनी हरामीपणा केला आहे. तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरं जा", असं उद्धव ठाकरे म्हणाले.