लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शनिवारी ढगफुटीसारख्या पावसाने नागपूरमध्ये हाहाकार उडाल्यानंतर रविवारी पश्चिम विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने बुलढाणा, जळगाव, नाशिकसह मराठवाड्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली. पावसासाठी आसुसलेल्या भागाला दिलासा मिळाला असला तरी अनेक भागांत ढगफुटीसदृश पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणवडी, खडदगाव, पिंपळखुटा धांडे व माळेगाव गोंड या नांदुरा तालुक्यातील चार गावांत शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे शेत शिवारांना तलावांचे स्वरूप आले. नदी व नाल्याच्या काठावरील जमिनी खरडून गेल्या. १२५ घरांची पडझड, तर ७६ जनावरे वाहून गेली आहेत. या गावांत तीन तास धो-धो कोसळल्याने परिसर जलमय झाला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही दीर्घ खंडानंतर विविध भागात जोरदार पावसाने झोडपून काढले.
नागपुरात पाच, बुलढाण्यात एक मृत्यू
नागपुरात शनिवारच्या पूरपरिस्थितीमुळे दहा हजार घरांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर पार्किंगमधील ३८५ कार पाण्यात बुडाल्याने १०० कोटींचे नुकसान झाले. पुरामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. नांदुरा (जि. बुलढाणा) येथे पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू आहे. मराठवाड्याच्या सहाही जिल्ह्यांत बरसला
n मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या सहा जिल्ह्यांतील ५० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० पैकी आठ मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. n विभागात अजूनही २४ टक्के पावसाची तूट कायम आहे. मात्र दोन दिवसांतील पावसाने माना टाकणाऱ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील शेडमध्ये पाणी शिरल्याने ३००० कोंबड्यांचा मृत्यू झाला.
जळगावला फटका n जळगाव जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने तडाखा दिला. धरणगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पाळधी महसूल मंडळात एकाच रात्री तब्बल १८२ मिमी पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. n जिल्ह्यातील १० महसूल मंडळांमध्येदेखील अतिवृष्टीची नोंद आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट हटले असल्याचे चित्र आहे. अंजनी धरण शंभर टक्के भरले आहे.
सोयाबीन उत्पादनात ३० टक्के घट? वाशिम : अतिपाऊस तर कुठे पावसाचा खंड यामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. विविध रोगांच्या प्रादुर्भावाने यंदा सोयाबीनचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटू शकते, असा अंदाज सोयाबीनचे मार्गदर्शक तथा चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी व्यक्त केला.