मुंबई : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शहर उपनगरात ११,६४७ रुग्णांचे निदान झाले असून, २ मृत्यू झाले आहेत. तर दुसरीकडे १४,९८० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ८ लाख २० हजार ३१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्के आहे.
४ ते १० जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.८७ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३६ दिवसांवर आहे. दिवसभरातील ११ हजार रुग्णांपैकी ९ हजार ६६७ रुग्ण लक्षणविरहीत आहेत, हे प्रमाण ८३ टक्के आहे. मुंबईत एकूण ९ लाख ३९ हजार ८६७ कोरोना बाधित असून, मृतांचा आकडा १६ हजार ४१३ इतका आहे.
पालिकेने रुग्णांचा शोध घेण्यासाठी २४ तासांत ६२,०९७ चाचण्या केल्या असून, एकूण १ कोटी ४३ लाख २५ हजार १४४ कोरोना चाचण्या केल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय प्रतिबंधित क्षेत्र शुन्यावर आले आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६३ आहे. मागील चोवीस तासांत रुग्णांच्या संपर्कातील ४५ हजार ६५० अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.
सेंट जॅर्ज, जीटी आणि कामा पुन्हा कोविड सेवेत
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यावर शहर उपनगरातील मुंबईतील कोविड समर्पित रुग्णालये इतर रुग्णसेवेसाठी खुली करण्यात आली. त्यात शासकीय सेंट जॉर्ज, जीटी, कामा रुग्णालयांचा समावेश होता. तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याने ही रुग्णालये पुन्हा कोविड समर्पित करण्यात आल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले. सध्या मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
बहुतांश रुग्ण लक्षणविरहित असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात येत आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालये समूहातील जीटी रुग्णालय पुन्हा एकदा कोविड समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.