कोरोनावर मात करण्यासाठी श्वान पथकातील श्वानांचा व्यायाम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 07:34 PM2020-05-02T19:34:31+5:302020-05-02T19:35:17+5:30
लॉकडाऊन काळात श्वान विश्रांतीवर; वेळोवेळी तपासणी सुरू
कुलदीप घायवट
मुंबई : कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर पडले आहे. कोरोनाचे परिणाम अनेक देशातील प्राण्यांवर होताना आढळून आले आहेत. त्यामुळे पाळीव प्राण्यांची काळजी घेतली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सुरक्षेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणारे रेल्वे सुरक्षा बलाचे श्वान पथक लॉकडाऊन काळात विश्रांतीवर आहेत. मात्र कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी श्वानांचा दररोज व्यायाम सुरु आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ विभागात डॉबरमन, स्निपर या जातीचे श्वान आहेत. प्रवाशांची सुरक्षा, विस्फोटक,अंमली पदार्थांचा गंध घेऊन शोध घेणे, स्थानकावर गस्त घालणे अशी दररोजची कामे हे श्वान करत होते. मात्र उपनगरीय रेल्वे, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस अशी प्रवासी सेवा बंद आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर होणारी लाखोंच्या संख्येची गर्दी शून्यावर आली आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील श्वान पथक विश्रांतीवर आहे. कोरोनाचा धोका पाळीव प्राण्यांना होऊ शकतो. यासह जास्त विश्रांती करून श्वानाचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे दररोज व्यायाम करणे, विस्फोटकाचा गंध घेणे, स्थानकावर फेरफटका मारणे अशी दिनचर्या सुरु आहे.
--------------------------------
सात ते आठ दिवसांनी तपासणी
प्रत्येक श्वानांची जबाबदारी दोन आरपीएफ कार्मचाऱ्यावर असते. हॅन्डलर आणि सपोर्ट हॅन्डलर असे दोन जण एका श्वानाची काळजी घेतात. यांच्या आरोग्याची तपासणी वेळोवेळी घेतली जाते. पूर्वी हि तपासणी एक महिन्याच्या कालावधीत घेतली जात होती. मात्र आता कोरोनाच्या काळात सात ते आठ दिवसांनी केली जाते.
------------------------------
योग्यप्रकारे स्वच्छता केली जाते
कोरोनाच्या काळात श्वानांची योग्य ती काळजी घेतली जाते. श्वानाचे पंजे साफ करणे, केस कापणे, आवश्यकता असल्यास निर्जंतुकीकरणाची फवारणी करणे सुरूर आहे. ग्रूमिंग (स्वच्छता) करणे, फ्लेम गनने स्वच्छ करणे,आवश्यकतेनुसार आहार दिला जातो. त्यानंतर विश्रांती दिली जाते.
------------------------------
फिजिकल डिस्टन्स पाळला जातो
कोरोनाच्या काळात फिजिकल डिस्टन्स महत्वाचा नियम आहे. हा नियम श्वान देखील पाळत आहेत. प्रत्येक श्वानांमध्ये दोन साधारण दोन मीटरचे अंतर ठेवले जाते. आहार घेताना देखील हे अंतर कायम ठेवले जाते. श्वानांचा इतर बाहेरील लोकांशी संपर्क येऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते, अशी माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
------------------------------
मुंबई विभागातील श्वान पथक सध्या विश्रांती करत आहेत. त्यांची शरीर बांधणी योग्य राहावी, यासाठी व्यायाम करणे सुरु आहे.
- अश्रफ के. के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे
--------------------------------
प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशांचे सामग्रीची तपासणी, पेट्रोलिंग करणे अशी कामे बंद आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील श्वान पथकाचे सध्या कर्तव्य नाही. मात्र फेरफटका मारण्यासाठी ते स्थानकावर येतात. त्यांची ट्रेनिग नियमितपणे सुरु आहे.
- विनीत खरब ,विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे