आगरी कोळी महोत्सवाला सुरूवात
By admin | Published: January 4, 2015 12:15 AM2015-01-04T00:15:06+5:302015-01-04T00:15:06+5:30
भजनसंध्या... आगरी कोळी नृत्य.... लोककला...लावणी...कॉमेडीचा तडका...अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणाऱ्या आगरी कोळी महोत्सवाला शुक्रवारपासून सुरूवात झाली.
नवी मुंबई : भजनसंध्या... आगरी कोळी नृत्य.... लोककला...लावणी...कॉमेडीचा तडका...अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणाऱ्या आगरी कोळी महोत्सवाला शुक्रवारपासून सुरूवात झाली. हा महोत्सव नेरूळ येथील रामलिला मैदानामध्ये भरला असून रसिकांचा, ग्राहकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
आखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या वतीने गेल्या ९ वर्षापासून आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दिवसेंदिवस या महोत्सवाची रंगत वाढत चालली आहे. महाराष्ट्रातील महिला किर्तनकार राधा सानप यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. हौसारामबुवा पाटील, अशोकबुवा म्हात्रे, अनंतबुवा ठाकुर, रामदास पाटील, अमृत पाटील व संतोष पाटील आदि वारकरी संप्रदायातील मंडळींनी भजन सादर करून महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफले. यावेळी मोठ्या संख्येने नेरूळकरांनी उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घेतला.
दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे, त्याचबरोबर आगरी- कोळी पध्दतीचे खास जेवण दिल्ली कुलपी, पाणीपुरी, चायनीज आदि खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. महोत्सवात येणाऱ्यांसाठी साजश्रुंगार आणि घरगुती सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे, तसेच तरूणपिढीसह लहान मुलांना फुल- टू धम्माल करता यावी, यासाठी विविध प्रकारचे पाळणे, जादूची गुहा उभारण्यात आली असून यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवामुळे आगरी - कोळी समाजाच्या परंपरा येथे राहणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकानाही कळाव्यात हा हेतू असून त्यानिमित्ताने समाजाची संस्कृती जतन केली जात आहे. त्यामुळे असे महोत्सव होणे गरजेचे असल्याचे सानप यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी सिडको संचालक नामदेव भगत, नगरसेविका इंदूमती भगत, नगरसेवक रामाशेठ वाघमारे, रंगराव आवटी, अमित पाटील, कॉग्रेसच्या लिना लिमये आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. रविवारी डॉ. उमेश कामतेकर प्रस्तुत हा खेळ लावण्यांचा- लावणी सोहळा होणार आहे. (प्रतिनिधी)