लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वेच्छानिवृत्तीचे संकट, दर महिन्याला पगाराची प्रतीक्षा आणि सर्व भत्त्यांमध्ये कपात, अशा कामगारांचीही आर्थिक कोंडी करणाऱ्या बेस्ट प्रशासनाविरोधात बंड पुकारण्याची तयारी कामगारांनी केली आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टची साथ कामगारही सोडण्याच्या तयारीत आहेत. कामगार संघटनेने घेतलेल्या मतदानामध्ये ९७ टक्के कामगार संपाच्या मन:स्थितीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बेस्टला वाचविण्याचा कृती आराखडा तयार करून, पालिकेकडून मदत मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या बेस्ट प्रशासनाला, आता आपल्याच कामगारांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.गेल्या दोन दशकांपासून बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मात्र, सतत वाढणारा आस्थापना खर्च, मोनो-मेट्रोच्या स्पर्धेत दुरावलेला प्रवासीवर्ग, यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावत गेली. त्यामुळे कामगारांचे पगार देणेही बेस्टसाठी अवघड होऊन बसले. बँकांमधून कर्ज काढून आतापर्यंत कामगारांचे पगार बेस्टने दिले आहेत. मात्र, वारंवार कर्ज काढून बँकांमध्ये बेस्टची पत कमी झाली आहे. त्यामुळे बेस्टला टाळे लागण्याची वेळ आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने पालिकेकडे मदत मागितली आहे. पालिकेच्या अटीनुसार बेस्टला आर्थिक शिस्त लावून बचतीचे मार्ग स्वत: शोधावे लागणार आहेत, परंतु कामगार कपात, त्यांच्या भत्त्यात कपात, प्रवासी भाडेवाढ, यामुळे हा आराखडा वादात सापडून लांबणीवर पडला आहे.शशांक राव म्हणाले की, दर महिन्याचा पगारही वेळेत मिळत नसल्याने, कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी आतापर्यंत बेस्ट संघटनांनी अनेक वेळा संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र, कामगारांना संप नको असून, संघटनेच्या दबावात संप होत असल्याचे सरकारचे म्हणणे होते. म्हणूनच मंगळवारी बेस्टच्या बस आगारांच्या आणि कार्यशाळांच्या गेटबाहेर मतदान घेण्यात आले. त्यात २२ हजार कामगारांपैकी १९ हजार ९४ कामगारांनी मतदान केले. एकूण मतदानापैकी तब्बल १८ हजार ५३७ कामगारांनी बेस्ट प्रशासनाविरोधात संप करण्यास कौल दिला आहे, असे राव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. - बेस्टच्या ताफ्यात ४८०० बसगाड्या होत्या. सध्या बस ताफा ३७०० आहे. यापैकी ३५०० बसगाड्या रस्त्यावर धावतात. ३०३ नवीन बसगाड्या बेस्ट खरेदी करणार होती. ११८ बस गाड्यांची आॅर्डर रद्द करण्यात आली आहे.- बेस्ट उप्रक्रमाच्या बसगाड्यांमधून ३० लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात, तर बेस्टमार्फत कुलाबा, चर्चगेट ते सायन, माहीमपर्यंत शहर भागातील १० लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. बेस्ट उपक्रमाच्या डोक्यावर सुमारे २१०० कोटींचे कर्ज आहे.- बेस्टमधील विविध कामगार संघटना एकत्रित येऊन स्थापन झालेल्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने, विविध मागण्यांसाठी बंद पुकारण्याची तयारी केल्याचे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे, यामध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचाही समावेश आहे.- कॅनडियन वेळापत्रक रद्द करणे, खासगी बसगाड्या भाड्याने घेणे आणि कामगारांच्या पगाराची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्याची मागणी करीत, हा बंद पुकारला जाण्याची शक्यता आहे.- बेस्ट उपक्रमात ४४ हजार कामगार-अधिकारी आहेत. त्यांच्या वेतनापोटी दरमहा १२० कोटी रुपयांची तजवीज बेस्ट प्रशासनाला करावी लागते. बेस्टची आर्थिक पत कमी झाल्याने, बँक केवळ बेस्टच्या नावावर कर्ज देण्यास तयार नाहीत. - बचतीचा पहिला मार्ग म्हणून बेस्टने २७८ वातानुकूलित बसगाड्या बंद केल्या, तसेच बेस्टच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, या दरवाढीस विरोध असल्याने हा प्रस्ताव अडचणीत आहे. असा आहे मतदानाचा निकालएकूण कामगार - २२ हजारमतदानात सहभाग - १९ हजार ९४संपाच्या बाजूने - १८ हजार ५३७बाद - ६१संपाच्या विरोधात - ४९६अशा आहेत बेस्टच्या मागण्याआर्थिक मदत मिळावी.कर्जाचे व्याज दर कमी असावे .बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा.पालिका आकारत असलेल्या विविध करांतून सूट मिळावी.सोमवारी भूमिका जाहीर करू!या मतदानातून कामगारांमधील रोष समोर आला आहे. त्यामुळे दोनच दिवसांत कृती समितीची बैठक घेऊन बेस्ट उपक्रम काय चर्चा करते, ते पाहून सोमवारी अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल.- शशांक राव, बेस्ट कामगार नेते
बेस्ट कामगार बंडाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 3:52 AM