दिग्गजांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात

By admin | Published: February 6, 2017 03:11 AM2017-02-06T03:11:05+5:302017-02-06T03:11:05+5:30

‘मन बदला, मुंबई बदलेल’ अशी हाक देणाऱ्या काँग्रेस पक्षातील नेत्यांची मने मात्र अजूनही बदललेली दिसत नाहीत. महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनली असतानाही अंतर्गत गटबाजी आणि वादाने पक्षाला हैराण केले आहे

Beginning of Congress campaign in the absence of veterans | दिग्गजांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात

दिग्गजांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात

Next

मुंबई : ‘मन बदला, मुंबई बदलेल’ अशी हाक देणाऱ्या काँग्रेस पक्षातील नेत्यांची मने मात्र अजूनही बदललेली दिसत नाहीत. महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनली असतानाही अंतर्गत गटबाजी आणि वादाने पक्षाला हैराण केले आहे. त्याचीच प्रचिती रविवारी प्रचार मोहिमेच्या शुभारंभासाठी आयोजित सभेतही पाहायला मिळाली. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते गुरुदास कामत आदींच्या अनुपस्थितीच काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला.
रविवारी, मालाड पश्चिमेच्या मालवणी येथे मुंबई काँग्रेसने प्रचाराच्या शुभारंभाची सभा आयोजित केली. या वेळी ‘संकल्प’ या नावाचा पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, आमदार अमिन पटेल, अस्लम शेख, माजी खासदार एकनाथ गायकवाड, मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते. मात्र, चर्चा रंगली ती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि कामतांच्या अनुपस्थितीची. त्यांच्या अनुपस्थितीमागील कारण समजू शकले नाही.
सभेत बोलताना संजय निरुपम यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले. यामध्ये गेल्या २५ वर्षांमध्ये सेना, भाजपाने मुंबईची वाट लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या ‘मातोश्री’समोरील खड्डे बुजवू शकले नाहीत, तर मग ते मुंबईचा विकास कसा करतील, असा प्रश्न त्यांनी विचारला. सर्वसामान्य जनतेला खड्ड्यात टाकण्याचे काम सेना-भाजपावाल्यांनी केले. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी, वीज आणि शौचालयाची सुविधा देण्यात या दोन्ही राजकीय पक्षांतील लोकप्रतिनिधी अयशस्वी ठरले आहेत. यामुळे मुंबईत परिवर्तन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचे आवाहन निरुपम यांनी मतदारांना केले. सेना आणि भाजपाने पालिकेत टेंडर प्रक्रिया राबवून त्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. गोवा, पंजाबमध्ये पार पडलेल्या निवडणुकीवरून काँग्रेस पक्षाला मुंबईत मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे असा अंदाज प्रभारी मोहन प्रकाश यांनी केला. एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो, पण त्यांनी चहा विकला की नाही हे आपण पाहिलेले नाही; परंतु मोदी सरकार देश विकताना आपण पाहत आहोत, अशी टीका त्यांनी केली.
नोटाबंदी करून कोणाचा फायदा झाला आहे तसेच कॅशलेशमध्ये कोणाची हिस्सेदारी आहे हे भाजपा सरकारने जाहीर करावे. आम्ही सर्व मुंबई काँग्रेसमधील नेते मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र आलो आहोत.
आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. जाणूनबुजून माध्यमात तशा बातम्या निर्माण केल्या जात असल्याचे माजी खासदार प्रिया दत्त यांनी भाषणादरम्यान सांगितले.

Web Title: Beginning of Congress campaign in the absence of veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.