वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या समुपदेशन फेरीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 06:54 AM2019-06-10T06:54:05+5:302019-06-10T06:54:26+5:30
सीईटी सेल : वेळापत्रक संकेतस्थळावर जारी
मुंबई : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर प्रवेश नियमन प्राधिकरणानेही प्रवेश रद्द केले. खुल्या गटातील प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवून त्यासाठी समुपदेशन फेरी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या समुपदेशन फेरीचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जारी करण्यात आले आहे.
पदव्युत्तर प्रवेश फेरीसाठी राज्यामध्ये १५०० जागा असून, त्यासाठी जवळपास ३५०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. समुपदेशन फेरीमध्ये दररोज किमान ५०० विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे समुपदेशन करून त्यांना मेरिटनुसार पुन्हा प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीमध्ये पुन्हा नव्याने प्रवेश घ्यावा लागणार आहे. तसेच या फेरीमध्ये जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत त्यांनाही प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा केंद्राचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. सोबतच ही फेरी १७ जूनपर्यंत किंवा त्याआधी पूर्ण करण्यात येईल, असे सीईटी सेलने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ही फेरी ९ जूनपासून भायखळा येथील ग्रांट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे.जे. हॉस्पिटलच्या कॅम्पसमधील अॅनाटॉमी हॉल मध्ये सुरू आहे. १२ जूनपर्यंत ही फेरी सुरू राहणार असून त्यानंतर या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम फेरीतून प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.
...तर प्रवेश होणार रद्द!
च्समुपदेशन फेरीमध्ये विद्यार्थ्यांना स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या क्रमांकानुसार ते हजर न राहिल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम प्रवेश घेताना जे पर्याय दिले होते, त्याच पर्यायांचा या फेरीमध्ये विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य पर्याय या फेरीमध्ये मांडता येणार नाहीत. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या सध्याच्या जागेपेक्षा दुसरी चांगली जागा मिळाल्यास त्याचा पूर्वीचा प्रवेश रद्द होऊन ती जागा अन्य विद्यार्थ्यासाठी उपलब्ध होईल.
च्अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे व शुल्काचे डीडी सोबत आणायचे आहेत. त्यामुळे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची प्रमाणपत्रे व १५०० रुपये शुल्क भरून त्यांचे प्रवेश निश्चित करायचे आहे. प्रवेश निश्चित केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश रद्द करता येणार नाहीत. समुपदेशन फेरीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा खासगी संस्थांना भरण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.