मुंबई - स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक ठरलेले पूल तत्काळ पाडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. यांपैकी काही पुलांचा वापर अद्याप सुरू असून काही बंद पुलांच्या खालून वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडणारा पादचारी पूल कोसळल्यानंतर धोकादायक पूल पाडण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानुसार, पवई आणि मरिन लाइन्स येथील पादचारी पूल जमीनदोस्त करण्यात आले आहेत. पूल पाडण्यापूर्वी पादचाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याने सर्व धोकादायक पूल पाडण्यास आणखी काही काळ लागणार आहे.मुंबईतील सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये १८ धोकादायक पूल पडून त्यांची पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, सर्व धोकादायक पूल वापरण्यासाठी बंद करीत पडण्याचा निर्णय घेण्यात आला. यांपैकी केवळ सात पूल पाडण्यात आले असून, उर्वरित पुलांंपैकी काही पुलांचा वापर सुरू होता. १४ मार्च रोजी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल कोसळून सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. धोकादायक पुलाला फिट ठरविणाऱ्या स्ट्रक्चरल आॅडिटरच्या बेपर्वाईबरोबरच पालिका अधिकाऱ्यांचाही कामचुकारपणा या दुर्घटनेच्या चौकशीतून उजेडात आला.या प्रकरणी जोरदार टीकास्त्र सुरू होताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील सर्व पुलांच्या फेरतपासणीचे आदेश दिले. धोकादायक जाहीर झालेले पूल पाडण्यात येत नसल्याने मुंबईकरांवरील धोका कायम आहे. त्यामुळे मरिन लाइन्स चंदनवाडी येथील धोकादायक पूल होळीनिमित्त असलेल्या सुट्टीच्या काळात पालिकेने जमीनदोस्त केला. पवई तलाव येथील पादचारी पूलही दोन दिवसांपूर्वी पाडण्यात आला आहे. मरिन लाइन्स दक्षिणेकडील पूलही पाडण्याचे काम सुरू आहे. वाहतुकीमध्ये अडथळा टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेतच पूल पाडण्याचे काम करण्यात येत आहे. उर्वरित धोकादायक पूलही याच पद्धतीने पाडले जाणार असल्याचे पूल विभागातील अधिकाºयांने सांगितले.पर्यायी व्यवस्थाअभावी पूल पाडण्यास विलंबकाही पादचारी पूल नाल्यांवर असून, रस्त्याच्या पलीकडे जाणयासाठी पादचाºयांकरिता तो एकमेव मार्ग आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत असे पूल पाडणे शक्य नाही. तरीही नागरिकांना धोकादायक पुलांवरून जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. स्थानिक विभाग कार्यालयांना त्यांच्या विभागातील धोकादायक पुलांचा वापर बंद करून तत्काळ पाडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानंतर, पूल विभागामार्फत या पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.चंदनवाडी पूल जमीनदोस्त : चंदनवाडी येथील धोकादायक पुलाचा वापर सहा महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. या पुलाखालून वाहतूक सुरू असल्याने धोका कायम होता. रंगपंचमीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने बुधवारीच चंदनवाडी येथील पूल पाडण्यास पालिकेने सुरुवात केली. मरिन लाइन्स स्थानक येथील स्मशानभूमीला लागून असल्याने या पादचारी पुलाचा मोठ्याप्रमाणात वापर होत होता. दवाबाजार, भुलेश्वर आणि काळबादेवी या व्यवसायिक भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल होता. जेसीबी, क्रेन आणि गॅस कटरच्या साहाय्याने हा पूल पाडण्यात आला.असे आहेतधोकादायक पूल...मुंबईतील २९६ पुलांचे आॅडिट करण्यात आले आहे. यापैकी १८ पुलांची पुनर्बांधणी, ११० पूल चांगल्या स्थितीत, १०७ किरकोळ दुरुस्ती आणि ६१ मोठी दुरुस्ती करण्याची शिफारस स्ट्रक्चरल आॅडिटरने केली होती. यापैकी हंसबुर्ग मार्ग - वाकोला, हरी मस्जिद नाला - साकीनाका, वाळभट नाला - गोरेगाव पूर्व, आकुर्ली रोड - कांदिवली, मरिन लाइन्स (उत्तरेकडील), मरिन लाइन्स (दक्षिण), चर्नी रोड स्थानक पादचारी पूल, ओंकारेश्वर मंदिर - कांदिवली, बर्वेनगर -घाटकोपर पश्चिम पादचारी पूल, विठ्ठल मंदिर - इराणीवाडी, एसव्हीपी रोड- कांदिवली, एसबीआय कॉलनी - दहिसर.
मुंबईतील धोकादायक पूल पाडण्यास सुरुवात, महापालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:23 AM