मुंबई : कोरोनामुळे सगळ्यांचे कंबरडे मोडले आहे. गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला कोरोनाची झळ बसली आहे. आता तर कोरोनाचा सण उत्सवावर देखील परिणाम झाला आहे. मुंबईत दरवर्षी उत्सवावर लाखो कोटयवधी खर्च केले जातात. गणेशोत्सव तर मुंबईचा जीव की प्राण. मात्र यंदाच्या गणेशोत्सावर कोरोनाचे संकट आहे. परिणामी कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर पळविण्यासाठी प्रत्येज जण सज्ज झाला आहे. आणि याचे उदाहरण म्हणून यावर्षी प्रत्येक मुंबईकराने विशेषत: इथल्या तरूणाईने गणेशोत्सवात आरोग्यासह पर्यावरणोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये तरुण असलेल्या ज्योती राणे या नवी संकल्पना घेऊन आल्या आहेत. त्यांचे भक्ति सुधा भजन मंडळ आहे. गणेशोत्सवात त्यांनी अनेक वर्षे भजनाचे कार्यक्रम केले आहेत. यंदा कोरोनामुळे हे सर्व शक्य नाही. म्हणून आपल्या घरी राहूनच प्रत्येकीने गणपती गौरी सोबत भजनाचा व्हिडीओ काढयाचा. ग्रुपवर पोस्ट करायचा, असे त्यांनी ठरविले आहे. लांबूनच एकत्र येऊन आनंद घ्यायचा. मुख्य म्हणजे त्यांच्या मुलांनी स्वत: घरीच माती मागवून बाप्पा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगमन आणि विसर्जन घरीच करणार असल्याने सुरक्षित अंतर, आरोग्य व पर्यावरण साधले जाणार आहे.
पर्यावरण विषयाचे लेखक शिरीष मेढी हे देखील गणेशोत्सव पर्यावरणोत्सव करण्याचे आवाहन करत आहेत. कोरोनामुळे आपण सर्वजण गेल्या ५ महिन्यांपासुन किमान उपभोग घेऊन जगत आहोत. याचा निसर्गावर खुप चांगला परिणाम झाला. पक्षी, प्राणी मुक्त संचार करु लागले. मुंबईत मोर रस्त्यावर बागडु लागले. हवेचे प्रदुषण कमी झाले. पंजाबमधुन हिमालयातील बर्फ दिसु लागला. यावरुन हेच सिध्द होते की मानवाने ठरविले तर किमान गरजापुर्ती करुन आपण पर्यावरणाचा विनाश रोखू शकतो. या कोरोनाच्या संकटातुन मानवाला चांगला धडा शिकायला मिळाला. त्यामुळे आपण आपले उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्यावर भर द्यावा, असे आवाहन मेढी मुंबईकरांना करत आहेत.
दैवता पाटील यंदा गणेशमूर्ती बाहेरून आणणार नाहीत. घरीच मुलीबरोबर शाडूच्या मातीने मूर्ती बनवणार आहे. घरच्या घरी विसर्जन करणार आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असलेले कमलेश बारोट यांनी घरच्या घरी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गच्चीवर पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात येणार असून, गणेशोत्सवादरम्यानचे निर्माल्य घरातील झाडांसाठी खत म्हणून वापरणार आहेत.
गणेशोत्सवासाठी गिरगाव येथील जिजाऊ वूमन लीगल फोरमच्या अॅड. शुभांगी सारंग यांनी डिजिटल माध्यमांचा वापर सुरु केला आहे. गणेशोत्सवात महिलांसाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोदकाची अध्यात्माशी कशी जोड आहे. याची माहिती पाठविण्याचे आवाहन फोरमने केले आहे. जगभरातून कोणीही उपक्रमात सहभागी होऊ शकतो. गणेशोत्सवात महिलांना आरोग्याची माहिती डिजिटल माध्यमांद्वारे दिली जाणार आहे. एकंदर मुंबईचा यंदाचा गणेशोत्सव आरोग्य उत्सव आणि पर्यावरणोत्सव होणार असल्याचे चित्र आहे.
वांद्रे पूर्व येथील रामकृष्ण परमहंस मुंबई पब्लिक मराठी स्कूलच्या इयत्ता सहावी मधील सोनाली शिंदे या विद्यार्थीने चिकणमातीपासून श्री गणेशाची मूर्ती बनविली आहे. विद्यार्थ्यांनी घरच्या घरी सहजपणे चिकणमातीपासून आकर्षक मूर्ती बनविण्यासाठी व त्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी हस्तकला शिक्षक पेमारे यांनी मार्गदर्शन केले आहे.
------------------
- सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणेश मुर्ती २ फुटांची असावी.- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा.- गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.- आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत.- गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.- विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी.- घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे.- जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत.- महापालिका यंत्रणेकडे गणेश मूर्ती दान करा.- गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश द्यावा.- दर्शनासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल.
------------------
- कोरोनाशी लढणा-यांना महाआरतीचा मान- हाऊसिंग सोसायटयांचे जीवदान- मोदक, अध्यात्म आणि आरोग्य- डिजिटल महिला भजनी मंडळ- गणेशोत्सवात मालेगाव पॅर्टन- कौशल्य विकासाला प्राधान्य- निर्माल्याचे होणार खत- नद्या होणार जिंवत- बाप्पा मातीचा