Join us

कुपोषित बालकांना सुदृढ बनविण्याच्या मुंबई काँग्रेसच्या उपक्रमाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:09 AM

मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसने १ हजार २२४ कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ ...

मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसने १ हजार २२४ कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ बनविण्याच्या उपक्रमाची सुरुवात केली. गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी न्यूट्रिशन सेंटरही सुरू करण्यात आले.

कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ बनविण्याच्या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होत्या.

भाई जगताप म्हणाले की, काही लोक फक्त भाषणेच करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वर्षांपासून लाल किल्ल्यावरून, भारतात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याची घोषणा आपल्या भाषणातून देत आहेत. ती अजूनही पूर्ण केलेली नाही. नुसती भाषणे न करता आपल्या कृतीतून सशक्त समाज घडविण्याचे काम कसे करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा मुंबई काँग्रेसने सुरू केलेला प्रकल्प आहे. भविष्यात या प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्याचा मानस असल्याचे भाई जगताप यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालेल्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आज सद्भावनादिवशी १ हजार २२४ कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ बनविण्यासाठी मुंबई काँग्रेसने जसा पुढाकार घेतला, तसा प्रत्येक लोकप्रतिनिधीने घेतला, तर आपले महानगर आणि आपले राष्ट्र खऱ्याअर्थाने सुदृढ व सुपोषित होईल. देशाची भावी पिढी आपल्या पायावर खंबीरपणे उभी राहावी, हेच राजीव गांधी यांचे स्वप्न होते. आजच्या कार्यक्रमाद्वारे त्यांचेच कार्य पुढे नेत आहोत. येणाऱ्या काळात या कामाची व्याप्ती आणखी वाढवू, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, चंद्रकांत हंडोरे, पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांचीही भाषणे झाली.