सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जंजिऱ्याच्या सिद्दींनी पोर्तुगीजांच्या वाढत्या सागरी प्रभुत्वाला वेसण घातली. एडनच्या आखातापासून भारताच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत आपल्या आरमाराची जरब त्यांनी बसवली होती. दख्खनच्या राजकारणातील चढ-उतार आणि मुघलांचे वाढते साम्राज्य या दोहोंकडे लक्ष ठेवून ते विविध शाह्यांची आलटून-पालटून चाकरी करीत होते. सुलतानांनाही या दर्यावर्दींची गरज वारंवार भासत होती. जंजिऱ्याचे सिद्दी आणि युरोपिय आरमार यांचे अनिर्बंध साम्राज्य भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरले होते. त्या आरमारी सामर्थ्याला किनाऱ्यावरील व समुद्रातील जलदुर्गांचे कवच होते.
सन १६०० पर्यंत मुंबई परिसरात पोर्तुगीजांचा जम चांगलाच बसला होता. सतराव्या शतकात पोर्तुगीजांबरोबर डच, डॅनिश, ब्रिटिश आणि फ्रेंचही भारतात आले. यापैकी मुंबईवर पोर्तुगीजांनंतर ब्रिटिशांनी आपला ठसा उमटवला. १६०८ला ब्रिटिश व्यापारी साम्राज्य विस्ताराची दूरदृष्टी ठेवून सुरतला उतरले. त्यांच्यावर मुघलांचा वरदहस्त होताच. पुढे सात-आठ वर्षांत त्यांनी वखार स्थापन करून जमिनीवर ताबा मिळविण्यास सुरुवात केली. नौकानयनाची आधुनिक साधने, अद्ययावत युद्धसामग्री आणि समुद्राला अंगावर घेऊन व्यापाराला उतरण्याची वृत्ती या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ब्रिटिश हिंदी महासागरात साम्रज्यविस्तार करू लागले. कधी एकमेकांच्या बाबतील तटस्थ राहून तर कधी एकमेकांना मदत करून हे युरोपातील शत्रू आशियात व्यावहारिक मित्रत्वाने नांदत होते.
सतराव्या शतकाच्या मध्यात या आरमारी साम्राज्याला छेद देणारा एक द्रष्टा उदयाला आला. मराठा साम्राज्याचा पाया रोवून द्रष्टेपणाने स्थानिकांचे आरमार उभाणारा हा सम्राट होता ‘छत्रपती शिवराय’. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व ओळखले आणि मराठा साम्राज्याच्या आरमाराचा जन्म कल्याणच्या खाडीत झाला. १६५० आणि ६०च्या दशकात अनेक जलदुर्गांच्या साहाय्याने महाराजांनी सजगपणे समुद्रावरील पकड घट्ट केली. मुंबईच्या परिसरातही त्यांचा शिरकाव झाला. ते या उदयोन्मुख युरोपीय सत्तांना ओळखून होते. स्वराज्याला मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळजवळ तीनचतुर्थांश महसूल कोंकणातून येत होता. महसूल देणारी उत्तर कोंकणातील जवळजवळ सर्वच बंदरे मुंबई परिसरात एकवटली होती. १६५०च्या उत्तरार्धात आदिलशाही आणि मुघलांशी सामना करून मराठे आपले वर्चस्व प्रस्थापित करत होते, तर मुसलमान राजवटी पोर्तुगीजांविरुद्ध एकवटत होत्या.
नागरीकरणाच्या अस्तानंतर मुंबई परिसरातील बेटांवरील वस्तीही विरळ झाली होती. वाळकेश्वर-गीरगाव परिसरात शिलाहार काळापासून थोडीफार वस्ती होती. पिंपळवाडीतील एका प्राचीन शिलालेखावरून येथील मानवी वसाहतीचे प्राचीनत्व सिद्ध होते. पोर्तुगीजांनी गार्सिया द ओर्टा यांना टाऊन हॉल परिसर लीजवर दिला होता. दक्षिण मुंबईतील या खाजणांनी जोडलेल्या बेटावर आगरी-कोळ्यांची वस्तीही होती. परंतु १५व्या आणि १६व्या शतकात फारसे आश्वासक वातावरण नव्हते.
युरोपात दोन प्रबळ साम्राज्ये राजकीय वैवाहिक बंधनात अडकत होती. २३ जून १६६१ रोजी इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस् आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ब्रिगेंझा यांचा विवाह निश्चित झला. याच तहानुसार १६६२ मध्ये मुंबईच्या दक्षिणेकडील सात बेटांचा ताबा ब्रिटिशांकडे गेला. पुढे ही सातही बेटे जोडली जाणार होती. नव्या मुंबईचा जन्म होणार होता. ही मुंबईच्या इतिहासातील एका नव्या अध्यायाची सुरुवात होती!
- सूरज पंडित