बालभारती, कृतिपत्रिका : प्रश्नसंचाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:28 AM2018-12-26T04:28:24+5:302018-12-26T04:29:20+5:30
२०१८-१९च्या शैक्षणिक सत्रात दहावीच्या अभ्यासक्रमासाठी नवी पाठ्यपुस्तके आणि कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.
मुंबई : २०१८-१९च्या शैक्षणिक सत्रात दहावीच्या अभ्यासक्रमासाठी नवी पाठ्यपुस्तके आणि कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्याला अनुसरून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले होते. या प्रश्नसंचाच्या पहिल्या टप्प्याला विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्याचा दुसरा टप्पा आता बालभारतीकडून जाहीर करण्यात आला आहे. २४ डिसेंबरपासून या सराव प्रश्नसंचाच्या दुसºया टप्प्याला सुरुवात झाली असून हा टप्पा २ जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. दुसºया टप्प्याच्या पहिल्याच दिवशी ७० हजार ७४८ कृतिपत्रिका सर्व प्रश्नसंच डाउनलोड झाल्याची माहिती बालभारतीकडून मिळाली आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाने एक संपूर्ण मार्गदर्शनपर व्हिडीओ बालभारतीच्या वेबसाइटवर आणि यूट्युबवर अपलोड केले होते. विशेष म्हणजे हे व्हिडीओ त्या त्या विषयातील तज्ज्ञांचे आहेत. हे व्हिडीओ पाहून ही वाहिनी सबस्क्राइब केल्यावर विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे व्हिडीओ पाहता येतात. याचे पहिल्या टप्प्यात तब्ब्ल २४ हजार सबस्क्रिप्शन झाले असून ६ लाख ५० हजार लोकांनी ते पाहिले असल्याची माहिती बालभारतीकडून मिळाली आहे.
कृतिपत्रिका सर्व प्रश्नसंचाच्या पहिल्या टप्प्याला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. पहिल्या टप्प्यात सर्व विषयांच्या एकूण ७६ लाख ८६ हजार ३ प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यात आल्या होत्या. सराव प्रश्नसंच प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी त्या विषयाची संक्षिप्त उत्तरपत्रिकादेखील बालभारतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या आहेत. यालाही विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून या सराव प्रश्नसंचासाठी २५ लाख ६ हजार ८६४ उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडून डाउनलोड करण्यात आल्या आहेत.