Join us

शिमगोत्सवाला सुरूवात

By admin | Published: March 01, 2015 10:48 PM

हिंदू धर्मीयांचा मराठी वर्षातला शेवटचा सण म्हणजे होळी अर्थातच शिमगोत्सव. फाल्गुन पंचमीला पहिली होळी लावून शिमगोत्सव व होलिका उत्सवाला सुरूवात होते

अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडलाहिंदू धर्मीयांचा मराठी वर्षातला शेवटचा सण म्हणजे होळी अर्थातच शिमगोत्सव. फाल्गुन पंचमीला पहिली होळी लावून शिमगोत्सव व होलिका उत्सवाला सुरूवात होते. ती रंगपंचमीपर्यंत अर्थात फाल्गुन पौर्णिमेनंतर सहा दिवसांनी या सणाची सांगता होते. तर इतर राज्यात धूलिवंदनानंतर शिमगोत्सवाची सांगता होते, मात्र कोकणात रंगपंचमीपर्यंत गावाची जत्रा देवीच्या पालख्या रंगांची उधळण पारंपरिकपणे साजरी करण्यात येते.शिमगोत्सव सणाला कोकणात फार महत्त्वाचे स्थान आहे. फाल्गुन पंचमीपासून सुरू होणाऱ्या या सणात प्रत्येक दिवशी ढोल, नगाऱ्याच्या गजरात, तसेच बोंबा मारून फाटी गोळा करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी वेगवेगळ््या ठिकठिकाणी पारंपरिक पद्घतीने देवीच्या पालखींची मिरवणूक व यात्रा भरविण्यात येते. यावेळी होमाला पुरणपोळी, चुरमुऱ्याचे लाडू, चणे, लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच होमाची पूजा करून होम लावण्यात येतो. लहानथोरांपासून सर्वजण बोंबा मारत असतात. सलग ९ किंवा १० दिवस रात्री १० नंतर बच्चे कंपनी घराघरात जावून फाटी गोळा करतात. वर्षभर त्रास देणाऱ्यांच्या अंगणात जावून शिमगोत्सव साजरा करतात. टिमकी, खातूबाजा, नगारा वाजविण्याचा आनंद लुटतात. रात्री १२ ते २ वाजेपर्यंत होळी लावण्यात येते. यामध्ये होमाच्या आदल्या दिवशी चोर होळीला महत्त्व आहे. या दिवशी वर्षभर त्रास देणारे किंवा होळीसाठी लाकडे न देणाऱ्यांच्या परसदारी चोरी करण्यात येते व चोरलेले साहित्य होळीमध्ये टाकून होळी पेटविली जाते.