लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/ठाणे/डोंबिवली: लोकल वाहतुकीला गती देणाऱ्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ठाणे ते दिवादरम्यान धिम्या मार्गावर रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. जानेवारीपासून हे मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. तसे झाल्यास लोकलच्या फेऱ्या वाढतील आणि त्यांना होणारा मेल-एक्स्प्रेस, मालगाड्यांचा अडथळा कायमस्वरूपी दूर होईल. या कामासाठी यापुढील काळात असे आणखी मेगाब्लॉक घेतले जाणार आहेत.
रविवारच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मुंब्रा आणि कळवा स्थानकात लोकल थांबत नसल्याने तेथील प्रवाशांना टीएमटी, रिक्षेचा आधार घ्यावा लागला. मात्र ती व्यवस्था तोकडी पडली. सकाळी ८ वाजता सुरू झालेला हा ब्लॉक सोमवारी मध्यरात्रीपर्यंत चालला. यामुळे वाहतूक पाऊण तास विलंबाने सुरू होती.
जुना धीमा मार्ग एका टप्प्यात नव्या मार्गाला जोडण्यात आला. त्यामुळे पुढील मेगाब्लॉक होईपर्यंत त्या भागातील वाहतूक जुन्या मार्गावरून नव्या मार्गावर आणि पुन्हा जुन्या मार्गावर अशी वळवली जाणार आहे. नंतरच्या टप्प्यात पुढील रूळांची जोडणी केली जाईल.
लोकल वाहतुकीला फटका बसण्याची चिन्हे
- जुन्या आणि नव्या मार्गाची जोडणी केल्याने त्या पट्ट्यात वाहतुकीच्या वेगावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे धिम्या मार्गावरील वाहतूक पुढील काही दिवस रखडण्याची चिन्हे आहेत. त्याचा लोकल वाहतुकीला फटका बसण्याची चिन्हे आहेत.
- त्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सर्व काम पूर्ण झाले की हा मार्ग खुला होईल आणि जादा लोकल धावतील. लोकलच्या फेऱ्या वाढवून त्याचे वेळापत्रकही जानेवरीच जाहीर करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.