Join us

मिठी नदीखालील भुयारीकरणाच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:55 AM

१.८ किमीचा पट्टा नदीखालून जाणार।

मुंबई : मिठी नदीच्या खालून सर्वात आव्हानात्मक कामही बांद्रा-कुर्ला-संकुल (बीकेसी) येथून सुरू करण्यात आले आहे. आॅक्टोंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा एमएमआरसीचा मानस आहे. या प्रकल्पाचा धारावी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हा १.८ किमीचा पट्टा नदीखालून जाणार आहे.

कुलाबा वांद्रे सीप्झ हा मेट्रो भूमिगत असल्याने या प्रकल्पाचे काम प्रारंभीपासूनच आव्हानात्मक राहिले आहे. मेट्रो-3 मार्गिकेचे प्रस्तावित असलेल्या बीकेसी स्थानकापासून भुयारीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. कोलकात्यात हुबळी नदीच्या खालून झालेल्या देशातील पहिल्या बोगद्यानंतर दुसरा बोगदा हा चेन्नई येथील भुयारी मेट्रोसाठी करण्यात आला असून मिठी नदी पात्राखालचा हा तिसरा बोगदा असेल. या भुयारीकरणासाठी या खोदकामासाठी आॅस्ट्रेलियन पद्धतीचा वापर केला जाईल. बांद्रा येथील बीकेसी ते धारावीदरम्यान बोगद्याचा काही भाग नदीखाली तर खाली भाग तिवरांच्या खाली आहे. बोरिंग यंत्रे या दोन टनेलचे खोदकाम करतील. मेट्रोच्या मार्गात अन्य ठिकाणी बोगदे असणार आहेत. त्यापैकी एक कुलाब्याकडे येणार्या या गाडीसाठी असेल, तर दुसरा सीप्झकडे जाणार्या गाडीसाठी. भुयारीकरणाचे हे काम संपुर्णत: जमिनीखालून करण्यात येणार असल्याने पावसाळ्यामध्ये कोनताही अडथळा येणार नसून पावसाळ्यामध्येही हे काम सुरू राहणार आहे.

बीकेसी येथे येथे मेट्रोचे टर्मिनल उभारले जाणार असल्याने तीन बोगदे असतील. काही गाड्या बीकेसी येथे येतील आणि पुन्हा तेथून माघारी फिरतील. या गाड्यांसाठी तिसरा बोगदा असेल. त्याशिवाय धारावी ते बीकेसी दरम्यान एखादी गाडी बंद पडली, तर तिसर्या बोगद्यात बांधण्यात येणार्या ट्रॅकवरून बंद पडलेली गाडी बीकेसी टर्मिनलमध्ये आणली जाईल, अशी योजना आहे.या प्रकल्पात आतापर्यंत ५२ कि.मी.पैकी २६.१५ कि.मी. पेक्षा जास्त लांबीचे बोगदे खणून झाले आहेत. बोगदे खोदण्यासाठी मुंबई ठिकठिकाणी १७ टनेल बोरिंग मशीन कार्यरत आहेत.