अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा वावर

By सचिन लुंगसे | Published: December 30, 2022 06:24 PM2022-12-30T18:24:48+5:302022-12-30T18:25:04+5:30

हंपबॅक डॉल्फिन ३० ते ३५ मीटरपेक्षा कमी खोलीच्या पाण्यात आढळतात आणि बहुतेक वेळा मोठ्या भरतीच्या वेळी मोठ्या खाड्यांमध्ये प्रवेश करतात.

Behavior of humpback dolphins in the Arabian Sea | अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा वावर

अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा वावर

Next

मुंबई: कोकण सिटेशियन रिसर्च टीमचे सदस्य श्री मिहीर सुळे यांनी महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कृत Conservation genetics of humpback dolphins along the Maharashtra coast with a secondary focus on cetacean strandings हा प्रकल्प २०२०-२२ दरम्यान राबविला. या अभ्यासात राज्यासाठी प्रथमतः इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन (Sousa plumbea) च्या अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी मुलाखत सर्वेक्षणाचा वापर करून संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छिमारांकडून माहिती गोळा करण्यात आली आहे. माहितीनुसार असे कळले की अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा सलग वावर दिसतो.

हंपबॅक डॉल्फिन ३० ते ३५ मीटरपेक्षा कमी खोलीच्या पाण्यात आढळतात आणि बहुतेक वेळा मोठ्या भरतीच्या वेळी मोठ्या खाड्यांमध्ये प्रवेश करतात. त्यांच्या उथळ पाण्याच्या अधिवासामुळे, हंपबॅक डॉल्फिन सामान्यतः मच्छिमारांना त्यांच्या जहाजांमधून आणि किनाऱ्यावरूनही  दिसतात. हंपबॅक डॉल्फिनची प्रादेशिक सामान्य नावे किनारपट्टीवर भिन्न आहेत. 

अभ्यासाच्या दुसर्‍या टप्प्यात, अपघाताने जाळ्यात अडकून मेलेल्या व किनाऱ्यावर वाहून आलेल्या सागरी सस्तन प्राण्यांच्या शवांमधील ऊतींचे नमुने गोळा केले गेले. महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या कर्मचार्‍यांना प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून किनाऱ्यावर वाहून आलेल्या सागरी सस्तन प्राण्यांना हाताळण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी दोन कार्यशाळा (२५ जून २०२१ आणि २० जुलै २०२१) आयोजित करण्यात आल्या होत्या.

या अभ्यासातून हंपबॅक डॉल्फिनचे नमुने वापरून, अनुवांशिक विश्लेषण केले गेले. भारताच्या उर्वरित पश्चिम किनार्‍यावरील इतर नमुन्यांची महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर घेतलेल्या नमुन्यांशी तुलना केली असता असे समजले की या प्राण्यांमध्ये जनुक प्रवाह आहे. हे जनुक प्रवाह असे दर्शवितात की हंपबॅक डॉल्फिनची लोकसंख्या बहुधा पश्चिम किनारपट्टीवर जोडलेली आहे आणि लोकसंख्येमध्ये कोणतेही खंड पडलेले दिसत नाहीत. 

लोकसंख्येचे अनुवांशिक विश्लेषण हे देखील दर्शविते की महाराष्ट्राच्या किनार्‍यावरील हंपबॅक डॉल्फिनची लोकसंख्या (भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील लोकसंख्या) भारताच्या पूर्व किनार्‍याशी/बांगलादेशच्या लोकसंख्येशी सर्वात जवळून संबंधित आहे. सध्या भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर हंपबॅक डॉल्फिनच्या दोन वेगवेगळ्या प्रजाती असल्याचे मानले जाते, म्हणजे, इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन (S. plumbea) पश्चिम किनारपट्टीवर आणि इंडो-पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिन (S. chinensis) भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आढळतात, हे एक लक्षणीय निरीक्षण आहे. 

हंपबॅक डॉल्फिनची पश्चिम किनार्‍याची लोकसंख्या ओमानच्या लोकसंख्येशी जवळून संबंधित असावी कारण हिंद महासागर हंपबॅक डॉल्फिन (S. plumbea) दोन्ही प्रजाती समान भासतात.  तथापि, या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की ओमान आणि भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील हंपबॅक डॉल्फिनच्या लोकसंख्येमध्ये लक्षणीय प्रमाणात वेगळेपणा दिसतो.

मिहीर सुळे म्हणाले की ‘महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सागरी सस्तन प्राण्यांच्या सुमारे बारा प्रजाती आहेत, ज्याचे दस्तऐवजीकरण आधीच्या अभ्यासात आणि जाळ्यात अडकण्याचा नोंदींमध्ये आढळते. आपल्या किनारपट्टीवर त्यांच्या अधिवासाची फारशी माहिती नाही. या अभ्यासातून महाराष्ट्राच्या समुद्री भागात या डॉल्फिन्सच्या अधिवासाबाबत माहिती मिळाली आहे’.

वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष आणि कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान असे म्हणाले की “कांदळवन प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील डॉल्फिन्सच्या वैज्ञानिक अभ्यासासंदर्भात सुरू केलेल्या विविध संशोधन प्रकल्पांपैकी हा अभ्यास एक आहे आणि या अभ्यासामुळे आम्हाला राज्यातील डॉल्फिन्सचे अधिक चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यात मदत होईल”.

Web Title: Behavior of humpback dolphins in the Arabian Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई