नेस्को कोविड केंद्रातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:54+5:302021-05-10T04:06:54+5:30
पालिकेची मध्यस्थी; जुन्याच जागी राहण्याची दिली परवानगी लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रातील परिचारिकांसह ...
पालिकेची मध्यस्थी; जुन्याच जागी राहण्याची दिली परवानगी
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रातील परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांची उन्नत नगर येथील इमारतीतून, संतोष नगर येथील नवीन जागेत निवासाची व्यवस्था केल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून काम बंद आंदोलन पुकारले. पालिका प्रशासनाने वेळीच मध्यस्थी केल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले. आता कर्मचाऱ्यांना जुन्याच जागी राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्र आणि लसीकरण केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय तसेच इतर कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था महापालिकेने उन्नत नगर येथील शाळेशेजारी म्हाडाच्या इमारतीमध्ये केली होती. त्यानंतर नेस्को दोनचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी झाल्यानंतर, येथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था संतोष नगर येथील इमारतीत करण्यात आली. एका सेंटरसाठी दोन ठिकाणी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था असल्याने त्यासाठी असणारी कॅटरिंग सेवा, सुरक्षारक्षक तसेच अन्य प्रकारच्या सुविधांचा खर्च वाढणार असल्याने, महापालिकेने उन्नत नगर इमारतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना संतोष नगर येथील इमारतीत हलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात परिचारिका व इतर कर्मचारी थेट रस्त्यावर उतरले व त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. त्यांनी अचानक आंदोलन पुकारल्याने येथे काही काळ तणावाचे वातावरण हाेते. त्यामुळे पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेनंतर त्वरित पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी पुन्हा राहण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश दिले. त्यानुसार यशस्वी मध्यस्थी करत महापालिकेचे पी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना तिथेच राहता येईल, असे मान्य केले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करत कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले.
....................................