बॉण्डसक्तीचा निर्णय मागे, पीजी परीक्षा देता येणार
By अतुल कुलकर्णी | Published: November 24, 2017 06:06 AM2017-11-24T06:06:24+5:302017-11-24T06:07:12+5:30
मुंबई : सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करणा-या मुलांना बॉण्ड पूर्ण न केल्यास पीजीच्या परीक्षेला बसता येणार नाही, अशी सक्ती करणारा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागानेच मागे घेतला
मुंबई : सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करणा-या मुलांना बॉण्ड पूर्ण न केल्यास पीजीच्या परीक्षेला बसता येणार नाही, अशी सक्ती करणारा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागानेच मागे घेतला आहे. त्यामुळे आता या वर्षी एमबीबीएसला बसलेल्या मुलांना पीजीची परीक्षा देता येईल.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी या निर्णयाच्या फाइलवर सही केली असून त्याचा आदेश लवकरच निघेल असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. ‘लोकमत’ने या बॉण्डसक्तीचा विषय लावून धरला होता. ‘आॅक्सिजन’ची पूर्ण पुरवणी या विषयावर प्रकाशित केली होती. बॉण्ड पूर्ण न करता एमबीबीएसच्या मुलांना पीजीची परीक्षा दोन वेळा देता येईल, त्यानंतर मात्र त्यांना बॉण्ड पूर्ण केल्यानंतरच पीजीला बसता येईल, असा शासन नियम होता. येत्या जानेवारी २०१८ मध्ये पीजीच्या परीक्षा आहेत. अचानक सरकारने जुना नियम गुंडाळून याच वर्षीपासून बॉण्ड पूर्ण न करणाºया मुलांना पीजीची परीक्षा देता येणार नाही असा फतवा १२ आॅक्टोबर रोजी काढला होता.
यामुळे ज्यांनी नियमानुसार तयारी केली त्यांना परीक्षेच्या तोंडावर परीक्षा देता येणार नव्हती. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरताना याचे अनेक पैलू समोर आणले. शेवटी एक वर्षासाठी हा निर्णय पुढे ढकलला गेला. आता २०१९-२० या वर्षात तो लागू होईल. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी हा निर्णय दोन वर्षे पुढे तर विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी हा निर्णय एक वर्षासाठी पुढे ढकलण्याची शिफारस केली होती.