एमबीबीएस द्वितीय वर्ष; वादग्रस्त विधानाबाबत लेखकाने मागितली माफी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : द्वितीय वर्ष एमबीबीएसच्या पुस्तकातील तबलिगी जमातीसंदर्भातील निंदनीय, आक्षेपार्ह विधानांनंतर हे पुस्तक मागे घेण्यात आले.
तबलिगी जमातीवरील या पुस्तकातील आक्षेपार्ह विधानांवर ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेत निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर इसेन्शिअल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी या पुस्तकाच्या लेखकांनी दिलगिरी व्यक्त करून पुस्तकाच्या पुनर्मुद्रणात बदल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हे पुस्तक आता मागे घेण्यात आले आहे.
एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या इसेन्शिअल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत महामारी विज्ञान (एपिडेमिलॉजी) या भागात घटनांची चुकीच्या पद्धतीने मांडणी केल्याचे स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) या विद्यार्थी संघटनेने निदर्शनास आणून दिले. यात कोविड -१९च्या भारतातील प्रसाराविषयी एक भाग आहे, ज्यात लेखकानुसार कोरोनाच्या भारतातील प्रसारासाठी तबलिगी जमात समूह एक महत्त्वपूर्ण कारण असल्याचे म्हटले आहे. मात्र, याला समर्थन देणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचे एसआयओने म्हटले आहे.
* बुद्धिमत्तेवर नकारात्मक परिणाम
प्रकाशक आणि लेखक यांनी आपले कार्य प्रामाणिकपणाने आणि योग्य संशोधन करून केले पाहिजे. बनावट बातम्या आपल्या समाजात सहजपणे लोकांच्या बुद्धिमत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतात याबद्दलही आपण विचार केला पाहिजे, असे दक्षिण महाराष्ट्र एसआयओचे सचिव राफीद शहाब यांनी सांगितले.
.......................................................