मनोहर कुंभेजकर
मुंबई : कोविड-19 मुळे आपली संपूर्ण जीवनशैलीच बदलली असल्यामुळे सनिटेशन हॅन्ड वॉश विथ सोप, शुद्ध पिण्याचे पाणी, हेल्थ, हायजिन यांचा मिलाप असलेले स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत वर्सोवा,आरटीओ ऑफिस जवळ सुरू करण्यात आलेला 'बीइंग स्वच्छ युनिट' हा मुंबईतील पहिलाच उपक्रम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' या अभियाना अंतर्गत वर्सोवा विधानसभेच्या आमदार व 'ती फाउंडेशन'च्या अध्यक्ष डॉ. भारती लव्हेकर यांच्या पुढाकाराने 'ती फाउंडेशन' च्या वतीने 'बिईंग स्वच्छ स्टेशन' हा अभिनव उपक्रम वर्सोवा,आरटीओ ऑफिसच्या बाजूला,लिंक रोड येेेथे उभारण्यात आला आहे.या प्रकल्पाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय हात धुण्याच्या दिनाच्या निमित्याने प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे व शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.यावेळी नगरसेवक योगीराज दाभाडकर,नगरसेविका रंजना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बिईंग स्वच्छ स्टेशन" मध्ये नागरिकांना साबणाने हात धुण्याची मोफत सेवा पुरवली जाणार आहे जेणेकरून त्यांना कोविड-19 पासून संरक्षण मिळू शकेल. तसेच 'बिईंग स्वच्छ स्टेशन' मध्ये वॉटर एटीएम सुरू करण्यात आले आहे. जेणेकरून जनतेला स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळू शकेल. यासाठी फक्त एक रुपयांत 300 मिली पिण्याचे पाणी जनतेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्लास्टिक मुक्त वर्सोवा करण्याच्या दृष्टीने जनतेसाठी कागदाचे ग्लास क्ले बॉटल्स देखिल उपलब्ध करण्यात आले आहेत.
ती फाउंडेशन' पुरस्कृत वेसावे कोळीवाड्यातील हिंगळादेवी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना यामुळे रोजगारही उपलब्ध झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातर्गत सुरू करण्यात आलेले बीइंग स्वच्छ युनिट आता सर्वत्र उभे करावे लागणार असून ही काळाची गरज असल्याचे आमदार डॉ.लव्हेकर यांनी शेवटी सांगितले.